आठवडाभरात पोस्टात उघडली १६,८०० खाती!
By साईनाथ कुचनकार | Published: July 11, 2024 08:26 PM2024-07-11T20:26:34+5:302024-07-11T20:27:24+5:30
लाडक्या बहिणींच्या मदतीला पोस्ट विभाग आले धावून : बहिणींची पोस्टाला अधिक पसंती
चंद्रपूर : राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेचा अर्ज भरण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांसाठी सध्या महिलांची शासकीय कार्यालयांसह शाळा, ग्रामपंचायतीमध्ये गर्दी होत आहे. दरम्यान, योजनेसाठी बँकेमध्ये खाते असणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील बहुतांश बहिणी पोस्ट बँकेला अधिक पसंती देत आहेत. त्यामुळे १ ते ८ जुलैपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात पोस्टाद्वारे तब्बल १६ हजार ८०० खाती काढण्यात आली आहेत.
पोस्ट गावागावांपर्यंत पोहोचले असून, पोस्ट कार्यालयावर आजही नागरिकांचा विश्वास आहे. कमी वेळात आणि थेट गावातच खाते काढून मिळत असल्याने बहुतांश महिला इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खाते उघडत आहेत. इतर ठिकाणी खाते उघडण्यासाठी गेले तर दिवसभराची मजुरी बुडते, त्या तुलनेत गावात खाते उघडून मिळत असल्याने मजुरीसुद्धा होत असल्याने ग्रामीण भागात महिलांची पोस्ट कार्यालयात गर्दी होत आहे. योजना सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात १६ हजार ८०० खाती काढून देण्यात आले असून, महिलांच्या मदतीसाठी पोस्ट बँक धावून आल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे.
नागरिकांचा पोस्ट कार्यालयावर विश्वास आहे. आजही अनेक योजनांच्या माध्यमातून नागरिक पोस्ट बँकेतून व्यवहार करतात.
आधार कार्ड सोबत नेले तरी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेकडून खाते काढून दिले जाते. जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांनी पोस्ट कार्यालयात जाऊन किंवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधून खाते उघडून घ्यावे.
-एस. रामाकृष्णा
प्रवर अधीक्षक, चंद्रपूर