बोरमाळा येथे १७ पेट्या देशी दारू जप्त

By admin | Published: April 6, 2015 01:10 AM2015-04-06T01:10:06+5:302015-04-06T01:10:06+5:30

पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोरमाळा येथील एका महिलेच्या घरातून पोलिसांनी शनिवारी रात्री १७ पेट्या दारू

17 boxes of indigenous liquor were seized at Bormala | बोरमाळा येथे १७ पेट्या देशी दारू जप्त

बोरमाळा येथे १७ पेट्या देशी दारू जप्त

Next

पाथरी पोलिसांची कारवाई : चार फूट खोल खड्ड्यात लपवून ठेवला होता मद्याचा साठा
गेवरा :
पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बोरमाळा येथील एका महिलेच्या घरातून पोलिसांनी शनिवारी रात्री १७ पेट्या दारू जप्त केली. या कारवाईने दारू तस्कर हादरून गेले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची अंमलबजावणी सुरू असताना बोरमाळा येथील अंजू लिंगय्या कोंडावार ही महिला अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पाथरी पोलिसांनी मिळाली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी रात्री सदर महिलेच्या घरावर धाड टाकली. या कारवाईत घरातील चार फूट खोल खड्ड्यात दडवून ठेवलेल्या १७ पेट्या देशी दारू पोलिसांनी शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जप्त केली. ही कारवाई पाथरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कुरसंगे, पोलीस उपनिरीक्षक पाटील व व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
मूळची आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेली अंजू कोंडावार ही महिला गेल्या काही वर्षांपासून बोरमाळा येथे वास्तव्य करीत असून ती दारू विक्रीचा व्यवसाय करते. या कामी तिला स्थानिक लोकप्रतिनिधी व पोलिसांचेही पाठबळ होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
शासनाने १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली. त्यामुळे १ एप्रिलपूर्वीच परवानाधारक दारू विक्रेत्यांनी आपल्याजवळील मद्याच्या साठ्याची विल्हेवाट लावली. काही अवैध दारू विक्रेत्यांना दारूची विक्री केली, हे यावरुन उघड झाले आहे. या परिसरातील दारूभट्टीत वैध दारूचा साठा १ एप्रिलपर्यंत किती होता, विक्री झालेला तपशिल तपासून बघितल्यास बोरमाळा येथील धाडीत सापडलेल्या देशी दारूच्या साठ्याप्रमाणेच अन्य ठिकाणीही मद्याचा साठा सापडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बोरमाळा हे गाव गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर वैनगंगा तिरावर वसले आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातून याच मार्गाने गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी केली जात असे. गडचिरोलीत दारूबंदी असली तरी ती केवळ कागदोपत्री आहे.
आजही गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूची विक्री केली जात आहे, ही बाब जिल्हा प्रशासनासह सर्वश्रृत आहे. नव्याने दारूबंदी झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा तिरावरील गावात आता उलट परिस्थिती पहावयास मिळणार आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांमुळे अगोदरच अनेक गावांतून दारू हद्दपार झाली आहे. मात्र आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी कठोरतेने राबविली जात असल्याने गडचिरोली जिल्ह्याकडे मद्यपींचे लोंढे जाण्याची शक्यता आहे. सोबतच गडचिरोली जिल्ह्यातून नदीच्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी होण्याची शक्यता बळावली आहे.
ही दारू सिमेलगतच्या गावांमध्ये विक्री करण्यासाठी मद्यसम्राटांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. पोलीस यंत्रणा आता कशा पद्धतीने ही दारू तस्करी रोखणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या हतबलतेमुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक मद्य सम्राटांकडून मद्यपिंची गरज भागविण्याचे काम सुरू आहे. या अवैध व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. आता चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने गडचिरोलीतून दारूचा प्रवाह थेट जिल्ह्यात शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यासाठी गाव पातळीवरील तंटामुक्त गाव समिती, ग्रामसंरक्षण दलाला पोलीस विभागाकडून योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन त्यांची दारूबंदीसाठी मदत घेतल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मिळू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. (वार्ताहर)

Web Title: 17 boxes of indigenous liquor were seized at Bormala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.