वरोरा तालुक्यात १७ पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2016 01:05 AM2016-04-29T01:05:19+5:302016-04-29T01:05:19+5:30
वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या जंगलात उन्हाळ्याची चाहूल लागताच वन विभागाने जंगलात वन्यप्राण्याची तहान भागविण्यासाठी १७ पानवठे तयार केले आहे.
वनविभागाचा उपक्रम : वन्यप्राण्यांची भटकंती थांबविण्याचा प्रयत्न
प्रविण खिरटकर वरोरा
वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या जंगलात उन्हाळ्याची चाहूल लागताच वन विभागाने जंगलात वन्यप्राण्याची तहान भागविण्यासाठी १७ पानवठे तयार केले आहे. यामध्ये आठ नैसर्गिक तर नऊ कृत्रीम पाणवठ्याचा समावेश आहे.
मागील काही वर्षात वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने जिथे जंगल लुप्त झाले होते, त्या ठिकाणी झाडे लावून त्यांची जतन केल्याने अनेक ठिकाणी घनदाट जंगले उभी राहिली आहे. वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात झाला असून वन्यप्राण्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. वन्यप्राण्यांमध्ये निल गाय, हरीण, सांबर, रानडुकर यांच्यासोबत वरोरा तालुक्यातील जंगलात मागील काही वर्षापासून वाघाचे वास्तव्य आहे. घनदाट जंगलामुळे वन्यप्राण्यांना खाद्य जंगलात मिळत असल्याने जंगल बाहेर भटकंती कमी झाल्याचे मानले जात आहे. जंगलगतच्या गावातील बहुतांश कुटुंबीयांना वनविभगाच्या वतीने अनुदानावर गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आल्याने नागरिकांचे सरपणासाठी जंगलात जाणे कमी झाले आहे. यामुळे वन्यप्राणी व मानवी संघर्ष टळत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याला मार्च महिन्यापासून सुरुवात झाल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करीत गावामध्ये येऊ नये, याचे नियोजन वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने करीत १७ पाणवठे तयार केले आहे. त्याचे मजबूतीकरण करुन त्यामध्य ेटँकरने पाणी सोडणे सुरु केले आहे. संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पाणवठ्यात पाणी राहणार असल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करणार नाही, असे मानले जात आहे. १७ पाणवठ्यात १२ बारमाही तर पाच पाणवठे हंगामी आहेत.