खासगी मोबाईल कंपन्यांवर १७ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:24 PM2017-11-01T12:24:31+5:302017-11-01T12:27:34+5:30
चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या परवानगीविना ठिकठिकाणी जाहिरात बॅनर लावणाऱ्या खासगी मोबाईल कंपन्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या परवानगीविना ठिकठिकाणी जाहिरात बॅनर लावणाऱ्या खासगी मोबाईल कंपन्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या मोबाईल कंपन्यांकडून १७ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करून आयडिया मोबाईल कंपनीला दंडासहीत ३२ लाख ८२ हजार १९७ रुपयांचे टॅक्स भरण्याचा नोटीस बजावण्यात आला आहे.
प्रत्येकाला मोबाईल हे जीवनावश्यक झाले आहे. त्यामुळे विविध मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी ठिकठिकाणी मोठमोठे बॅनल लावले जात आहेत. मात्र यासाठी स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. यातून स्थानिक प्रशासनाचे महसूल बुडत असल्याची बाब समोर आल्याने महानगरपालिकेने खासगी मोबाईल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
मनपाच्या कर वसुली विभागाने चंद्रपूर शहरातील सर्व प्रभागात सर्व्हेक्षण करून अनाधिकृत बॅनर लावणाऱ्या खासगी कंपन्यांना एक टक्का दंडासह टॅक्स भरण्याचे नोटीस बजावले होते. चंद्रपूर शहरात ओपो मोबाईल कंपनीचे चार बॅनर लावण्यात आले होते. या कंपनीवर ५ लाख २१ हजार १३० रुपये, विवो कंपनीच्या २३ बॅनरसाठी ९ लाख ८० हजार ७१ रुपये, सॅमसंग मोबाईल कंपनीचे डिस्ट्रीब्युटर गोपाल सेल्स यांच्या १० बॅनर साठी २ लाख १२ हजार ३५८ रुपये वसूल करण्यात आले आहे.
आयडिया मोबाईल कंपनीने शहरातील नविन व जुन्या वस्तीमध्ये सर्वाधिक ७९ जाहिरात बॅनर लावले होते. याप्रकरणी महानगरपालिकेने या कंपनीवर ३२ लाख ८२ हजार १९७ रुपये टॅक्स भरण्याच्या नोटीस पाठविण्यात आले आहे. सदर टॅक्स न भरल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
गतवर्षी ८६ बॅनरला दिली होती परवानगी
शहरात दरवर्षीच वर्दळीच्या भागात विविध कंपन्यांचे बॅनर दिसून येतात. यासाठी महानगरपालिकेकडून रितसर परवानगी घ्यावी लागते. टॅक्स भरल्यानंतर महानगरपालिका बॅनर लावण्याची परवानगी देत असते. गतवर्षी १५ लाख ५६ हजार १४९ रुपये टॅक्स आकारून ८६ ठिकाणी बॅनर लावण्याची मंजुरी महानगरपालिकेने दिली होती. मात्र यापैकी गतवर्षीचे ८ लाख २२ हजार ८१७ रुपये वसुल होणे बाकी आहे. चालू वर्षात ४ लाख ८२ हजार ३४७ रुपये करवसुली करण्यात आली आहे.