चांदा खंड खरेदी विक्री संस्थेचे १७६ सभासद बोगस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 01:19 PM2017-10-28T13:19:58+5:302017-10-28T13:25:49+5:30
चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेत तब्बल १७६ जणांना शेतकºयांच्या नावावर गैर शेतकºयांना सभासदत्व बहाल केल्याची धक्कादायक बाब सहाय्यक निबंधकांच्या चौकशी अहवालातून उघड झाली आहे.
राजेश भोजेकर ।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेत तब्बल १७६ जणांना शेतकऱ्यांच्या नावावर गैरशेतकऱ्यांना सभासदत्व बहाल केल्याची धक्कादायक बाब सहाय्यक निबंधकांच्या चौकशी अहवालातून उघड झाली आहे. अहवालाला महिनाभरापेक्षा अधिक कालावधी होऊनही त्या बोगस सभासदांचे सदस्यत्व मात्र कायमच आहे हे विशेष.
चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संघात गैर शेतकऱ्यांचा मागील सहा वर्षांपासून भरणा सुरू असल्याची गंभीर तक्रार या संस्थेचे सभासद रामदास चौधरी व काही सदस्यांनी सहाय्यक निबंधकाकडे २६ आॅगस्ट २०१६ रोजी केली होती. या संस्थेत ज्यांच्या नावे सातबारा आहे अशा शेतकऱ्यांनाच सभासद होता येते. मात्र सातबारा नसतानाही ११५० ते १३३५ अनुक्रमांक असलेल्यांना सभासदत्व देण्यात आल्याची बाब तक्रारीत नमुद होती. या तक्रारीवर सहाय्यक निबंधकाने तब्बल आठ महिन्यांनी म्हणजेच २६ एप्रिल २०१७ रोजी तक्रारकर्त्यांना एका पत्रातून थातुरमातूर उत्तर पाठवून कर्तव्य बजावले. हा अहवाल कोणतीही चौकशी न करता संस्थेच्या कार्यकारी मंडळाने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनविल्याचे त्यांच्याच पुढील अहवालातून उघड झाले. २ आॅगस्ट २०१७ रोजी सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधकांनी सभासदांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सदर ११५० ते १३३५ अनुक्रमांक असलेल्या सभासदांचे सातबारा व ते तालुक्यातील कार्यक्षेत्रात राहणारे आहेत काय, अशी विचारणा सहाय्यक निबंधक व सहकारी संस्थेचे तालुका लेखापरीक्षक यांना पत्र पाठवून केली. तसेच सहायक निबंधकाच्या चौकशीवरही ताशेरे ओढले. सातबारा असल्याशिवाय शेतकरी सभासद होता येत नाही. मात्र असे अध्यक्ष व सचिव यांनी करून घेतलेले आहेत व त्यांनी निवडणुकीत भाग घेतलेला आहे, या तक्रारीची जाणिवही जिल्हा उपनिबंधकांनी सहाय्यक निबंधकाला करून दिली. याबाबतचा सखोल अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे आदेशच बजावले होते. यानंतर मात्र सहाय्यक निबंधकाने पणन संचालक व जिल्हा उपनिबंधकांना चौकशी अहवाल पाठवून १७६ सभासद बोगस असल्याची बाब मान्य केली. यामध्ये अनुक्रमाक ११५० ते १३३५ पर्यंतच्या सभासदांपैकी नऊ सभासदांकडेच सातबारा असून उर्वरित १७६ सभासदांचा शेतकरी असल्याचा सातबारा हा पुरावा नाही. त्यामुळे त्यांचे सभासदत्व करण्याबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ११ अन्वये कार्यवाही करण्यात येत असल्याचेही नमुद करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही त्या १७६ जणांचे सभासदत्व कायम ठेवले आहे.
कार्यवाहीकडे सभासदांचे लक्ष
चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक १४ आॅगस्ट २०१६ रोजी झाली. सुभाष रघाताटे हे मागील २० वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्षपदावर आहे. मागील निवडणुकीत उपरोक्त बोगस सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता चौकशीत सदर सभासद बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहेत. यामुळे अध्यक्ष व कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीवरही आपोआपच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रारकर्त्या सभासदांनीही अध्यक्ष व कार्यकारी मंडळ बरखास्त करण्याची मागणी केल्यामुळे सहाय्यक निबंधकाच्या कार्यवाहीकडे सभासदांचे लक्ष लागले आहेत.
चांदा खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या त्या १७६ जणांचे सभासदत्व रद्द केलेले नाही. येत्या सोमवारी त्यांना नोटीस बजावणार आहेत. त्यांचे म्हणणेही ऐकून घेणे आवश्यक आहे. यात त्यांना दहा दिवसांची मुदत द्यावी लागेल. त्यांच्याकडे काही कागदपत्र असतील तर त्यांना त्यातून वगळले जाईल. कायद्याची प्रक्रिया असल्यामुळे थोडा वेळ लागेल. कर्जमाफीच्या प्रक्रियेत असल्यामुळे कार्यवाहीला उशिर झाला. सभासदत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीत भाग घेतला असेल तर त्यांचे संचालकपद रद्द होईल. त्यांनी मतदानाचा हक्क बजावला असेल तर संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी मात्र तक्रारकर्त्यांना न्यायालयात दाद मागावी लागेल.
- एम.ई. भगत, सहय्यक निबंधक,
सहकारी संस्था, चंद्रपूर