नागभीडला शेती दुरुस्तीसाठी १८ लाखांचा निधी
By admin | Published: April 19, 2017 12:42 AM2017-04-19T00:42:39+5:302017-04-19T00:42:39+5:30
येथील पाणलोट व्यवस्थापण समितीला नागभीड येथे शेती दुरुस्तीच्या कामासाठी १८ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे.
१३० शेतकऱ्यांची निवड : पाणलोट व्यवस्थापन समितीचा पुढाकार
नागभीड : येथील पाणलोट व्यवस्थापण समितीला नागभीड येथे शेती दुरुस्तीच्या कामासाठी १८ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. या समितीच्या नियंत्रणाखाली कामेही सुरु करण्यात आली आहेत.
नागभीड येथील एकूण १३० शेतकऱ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे आणि या १३० शेतकऱ्यांची सात गटात विभागणी करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतावर झालेल्या एकूण खर्चाच्या पाच टक्के रक्कम जमा करावी लागणार आहे. शेतीचे सपाटीकरण व बांधाची डागडूजी ही कामे येथे अपेक्षित आहेत.
तीन वर्षापुर्वी नागभीड येथील ग्रामसभेतून या समितीची निवड करण्यात आली होती. या समितीत ११ लोकांची निवड करण्यात आली असून ही समिती पंजीकृत करण्यात आली आहे. नागभीड येथील गणमान्य नागरिकांचा या समितीत समावेश आहे. शेतीच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून कामाचे कंत्राट यवतमाळ येथील जटेश्वर बहुउद्देशिय संस्था या संस्थेला मिळाले आहे. या कामावर तालुका कृषी कार्यालयाची देखरेख आहे.
कामाची सुरुवात अनिल उमक यांच्या शेतापासून करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य संजय गजपुरे, समितीचे अध्यक्ष प्रदीप तर्वेकर, सचिव रमेश ठाकरे, गणेश तर्वेकर, रवी आंबोरकर, नागभीडचे माजी सरपंच जहाँगीर कुरेशी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)