पती-पत्नीचा खून करून फरार झालेल्या जावई-सासऱ्यास ९ वर्षानंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 10:35 AM2022-01-30T10:35:28+5:302022-01-30T10:41:07+5:30
तब्बल ९ वर्षांनी हे दोघे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील पोनाला येथे नाव बदलून वास्तव्य करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.
चंद्रपूर : ताडाळी येथे नऊ वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन फरार बंदींना तब्बल नऊ वर्षांनंतर स्थानिक गुन्हे शाखेने अटक करून बेड्या ठोकल्या. नागो रुषी रेडलावार (रा. बापटनगर, चंद्रपूर) व सुनील रमेश साखरकर (रा. मोरवा) अशी अटक केलेल्या बंदींची नावे आहेत. हे दोघेही नाव बदलून तेलंगणात वास्तव्यास होते. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.
ताडाळी येथे नागो रेडलावार यांचा धाबा तर सुनील साखरकर (रा. मोरवा) यांचा पानठेला होता. दोघेही सासरे-जावई आहेत. या धाब्यावर चंदू कांबळे हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह काम करायचे. वेतन मागणीतून कांबळे यांचा रेडलावार यांच्याशी वाद झाला. यावेळी नागो रेडलावार, नागोची पत्नी शहनाज सलीम शेख व सुनील साखरकर यांनी कांबळे व त्यांच्या पत्नीची हत्या केली. या आरोपाखाली न्यायालयाने रेडलावार, साखरकर तसेच शहनाज सलीम शेख यांना १ मे २०१३ रोजी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, ३ सप्टेंबर २०१३ रोजी रेडलावार व साखरकर यांनी पॅरोलवर सुटी घेतली. तेव्हापासून ते जावई-सासरे फरार होते.
तब्बल ९ वर्षांनी हे दोघे तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील पोनाला येथे नाव बदलून वास्तव्य करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांना मिळाली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांचे पथक नेमून तेलंगणात रवाना केला. बंदी आरोपी नागो रेडलावार, सुनील साखरकर यांना अटक करण्यात पथकाला यश आले. पुढील कारवाईसाठी त्यांना घुग्घुस पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
असा घडले हत्याकांड
१७ ऑगस्ट २०११ रोजी चंदू कांबळे यांनी आपले तीन महिन्यांचे वेतन रेडलावार यांच्याकडे मागितले. यावेळी त्यांच्यात वाद झाला. रेडलावारने कांबळे यांना थापड मारून खोली खाली करण्यास सांगितले. दरम्यान, रेडलावार याचा जावई सुनील साखरकर तेथे आला. त्याने कांबळे यांचे हात पकडले. रेडलावार याने त्याच्याजवळील चाकूने कांबळे यांच्यावर वार केले. कांबळेची पत्नी पतीला वाचविण्यासाठी मध्ये आली असता तिच्यावरही चाकूने वार केले. यात दोघांचाही मृत्यू झाला.