१ कोटी ४ लाख ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 11:47 PM2019-07-23T23:47:07+5:302019-07-23T23:47:25+5:30
पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी अवघ्या २३ दिवसातच राज्यात २३ कोटी तर जिल्ह्यात १ कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली.
पर्यावरणाच्या संवर्धनाची उपयुक्तता पटल्याने नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, सामाजिक संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २३ दिवसात राज्यात १४ कोटी ७४ लक्ष ९७ हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. राज्याने आतापर्यंत ४०.४९ टक्के उद्दिष्ट गाठले. यामध्ये ठाणे जिल्हा आपल्या उद्दिष्टात अव्वल ठरला आहे. ठाणे जिल्ह्याचे ६६ लक्ष ८७ हजार ५५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ६९ हजार ३३३ वृक्षलागवड करून ७८. ४० टक्के गाठले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून ४१ लक्ष ६५ हजार ९०० वृक्षलागवडीचे लक्ष्य होते. आतापर्यंत ५७ हजार १८५ वृक्षांची लागवड करून ७५.८१ टक्के गाठले. कोल्हापूर जिल्ह्याने ८५ लक्ष ८७ हजार ७८५ वृक्षलागवड करून ७३.८७ टक्के ध्येय गाठले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने २५ दिवसात १ कोटी ४ लक्ष ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड केली.
जिल्ह्यातून वन विभागाने २२ लक्ष १४ हजार ९६० वृक्षांची लागवड करून ८४.५६ टक्के मध्य चांदा विभागाने २४ लक्ष ४० हजार ४६४ वृक्षलागवड करून ८६.५९ टक्के, सामाजिक वन विभागाने ७ लक्ष १५ हजार ६९६ वृक्षलागवड करून ४८.२ टक्के तर ग्रामपंचायतींनी १० लक्ष ६९ हजार २३२ वृक्षलागवड करून ५३.८४ टक्के आणि माय प्लांट अॅपद्वारे जिल्ह्यात १ हजार ५७३ वृक्षांची लागवड करण्यात आले आहे.
लोकसहभागातून उद्दिष्ट होणार पूर्ण
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसहभाग वाढत आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाची चळवळ गतीमान झाली. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात कार्य करणाºया विविध संस्था, महिला बचतगट आणि ग्रामपंचायतींचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी वन विभागासोबतच शासनाचे सर्व विभाग जोमाने कार्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनाही प्रेरणा मिळाली आहे.