घुग्घुसच्या विकासासाठी दोन कोटी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:53 PM2018-02-11T23:53:12+5:302018-02-11T23:54:14+5:30
घुग्घुसमध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुलाची निर्मिती, परीक्षा केंद्र, वाचनालय व दहा ओपनस्पेसचा विकास करण्यात येणार असून स्थानिक बसस्थानकाचे नुतनीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आॅनलाईन लोकमत
घुग्घुस : घुग्घुसमध्ये अत्याधुनिक क्रीडा संकुलाची निर्मिती, परीक्षा केंद्र, वाचनालय व दहा ओपनस्पेसचा विकास करण्यात येणार असून स्थानिक बसस्थानकाचे नुतनीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच घुग्घुसच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जय श्रीराम क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ घुग्घुसच्या वतीने बांगडे लेआऊट परिसरात तीन दिवशीय पालकमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उदघाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खा. अशोक नेते, आ. बाळू धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, चंद्रपूर मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सदस्य नितु चौधरी यांच्यासह मूल, गोंडपिंपरी, बल्लारपूर, चंद्रपूर, पोंभुर्णा, सावली, सिंदेवाही नगरपरिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आपल्या भाषणातून गाव विकासाच्या दृष्टीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली. ही मागणी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तेव्हाच पूर्ण करण्याची घोषणा केली. यावेळी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लाडूतुलाही करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक भाजप शहर अध्यक्ष विवेक बोढे, आभार माजी शहर अध्यक्ष विनोद चौधरी यांनी मानले. यावेळी घुग्घुस येथील पं.स.सदस्य निरिक्षण तांड्रा, ग्रामपंचायतचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह नागरिक उपस्थित होते.
आर्थिक स्वातंत्र्याचे आंदोलन उभारायचे - ना.सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलीदान करणाऱ्यांनी स्वातंत्र्याचे आंदोलन राबविले होते. आता आम्ही स्वतंत्र आहोत, मात्र आर्थिकदृष्टया सक्षम आणि सबळ होण्यासाठी आर्थिक स्वांतत्र्यांचे आंदोलन उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व स्तरातून महिलांना आर्थिकदृष्टया सबळ करण्याचे धोरण अंवलंबण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मूल रोडवरील एका स्वंयसेवी संस्थेच्या महिला सक्षमीकरणाच्या प्रकल्पाचे उदघाटन करताना ते बोलत होते. यावेळी डॉ.अशोक वासलवार, श्रीराम पान्हेरकर, उमेश वासलवार, डॉ.शिमला गाजर्लावार, मयूर भोई, डॉ.राकेश कोल्हावार, महेश वासलवार, कल्पना पलीकुंडवार, उषा बुक्कावार, माजी आमदार देवराव भांडेकर उपस्थित होते. जिल्हयामध्ये आगरझरी, पोंभूर्णा या ठिकाणी अगरबत्ती उद्योग उभा राहिला आहे. मोठया प्रमाणात महिलांना यातून रोजगार मिळाला आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये महिला बचत गटांना प्रशिक्षित केले जात आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या वस्तू अॅमाझान, फ्लिफकार्ट अशा विक्री व्यवस्थेतील दिग्गजामार्फत विकल्या जाणार आहे. अगरबत्तीसाठी या क्षेत्रातील प्रमुख कंपन्याशी बोलणे सुरु आहे. यातून महिलांना निश्चित रोजगार मिळणार आहे. राज्य सरकार कौशल्य विकासासाठी आग्रही असून कौशल्य असणारा माणूस स्वाभिमानी समाज निर्माण करतो. त्याचे कौशल्य त्याला कुठेही रोजगार निर्माण करण्यास मदत करते, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.