२ लाख ३५ हजार ५८० जणांनी टोचली कोविड लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:36 AM2021-04-30T04:36:08+5:302021-04-30T04:36:08+5:30
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी केलेल्या ९ हजार ४०४ नागरिकांनी बुधवारी लस घेतली. त्यामुळे आतापर्यंत लस घेणाऱ्यांची संख्या ...
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीसाठी नोंदणी केलेल्या ९ हजार ४०४ नागरिकांनी बुधवारी लस घेतली. त्यामुळे आतापर्यंत लस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ३५ हजार ५८० पर्यंत पोहोचली आहे. मागणीनुसार डोस मिळाल्यास उद्दिष्टपूर्तीला विलंब होणार नाही, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
जिल्ह्यात लसटंचाईच्या सावटातच लसीकरण मोहीम सुरू आहे. पुरेसे डोस न मिळाल्याने मागील आठवड्यात केंद्रे चार दिवस बंद ठेवावी लागली होती. मंगळवारी २५ हजार डोस मिळाल्याने बुधवारी चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील काही केंद्रे सुरू करण्यात आली. लस मिळेल की नाही, या धास्तीमुळे शेकडो नागरिकांनी काही केंद्रांवर सकाळी ८.३० वाजताच रांगा लावल्याचे दिसून आले. बुधवारी लसीकरण सुरू होताच नागरिकांची झुंबड उडाली. पुरेसे डोस नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील केंद्रांमध्येही रोज हा प्रकार घडत आहे. जिल्ह्यात ६० वर्षे, ४५ वर्षांवरील सहव्याधी आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. बुधवारी ९ हजार ४०४ नागरिकांनी लस घेतल्याने जिल्ह्यात आतापर्यंत लस घेणाऱ्यांची संख्या २२ लाख ३५ हजार ५८० झाली आहे.
एक मेचा मुहूर्त टळला
६० वर्षांपुढील २२४२९६, ४५ ते ६० वर्षे ४४८५८६, २५ ते ४४ वर्षांतील ६८४२९६ आणि १८ ते २४ वयोगटातील २८४८५२ असे एकूण १६ लाख ४१ हजार ८२९ नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले. १ एप्रिलपासून १८ वर्षांपुढील २ लाख ८४ हजार ८५२ जणांना लस देण्यात येणार होती. मात्र, हा मुहूर्त टळल्याने प्रतीक्षा करावी लागणार आहे.