...अन् आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा २ वर्षीय चिमुकला ठरला बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 03:06 PM2023-02-07T15:06:27+5:302023-02-07T15:08:52+5:30

रुग्णवाहिका आली तीन तास उशिरा, तिथे डाॅक्टरही नाही

2 year old boy became the victim of the laxity of the health department pombhurna | ...अन् आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा २ वर्षीय चिमुकला ठरला बळी

...अन् आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाचा २ वर्षीय चिमुकला ठरला बळी

googlenewsNext

पी. एच. गोरंतवार

पोंभुर्णा (चंद्रपूर) : दोन वर्षांच्या चिमुकल्याला न्यूमोनिया झाल्याने ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे भरती केले. चिमुकल्यावर योग्य उपचार झाला नाही, रुग्णवाहिकाही उशिरा मिळाली आणि रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनही न मिळाल्याने त्या चिमुकल्याचा वाटेतच मृत्यू झाला. ही घटना ३ फेब्रुवारीला पोंभुर्णा येथे घडली. मानव संजूसिंह बघेल असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पोंभुर्णा येथे भेलपुरीचा व्यवसाय करणारे संजुसिंह बघेल भेलपुरी विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे भरती करण्यात आले. प्राथमिक तपासणी करून वाफारा लावून चिमुकल्याचा कफ काढण्यात आला. मात्र प्रकृती पुन्हा गंभीर होत असल्याचे लक्षात येताच उपस्थित डाॅक्टरांनी त्यांना चंद्रपूरची रेफर स्लिप दिली.

पालक व नातेवाइकांनी रुग्णवाहिकेसाठी १०८ वर फोन केला. पण फोन करूनही रुग्णवाहिका तब्बल तीन तास उशिरा आली. तोपर्यंत मुलाची प्रकृती पुन्हा बिघडली व त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अशातच रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर नसल्याने व ऑक्सिजन न लावल्याने त्या चिमुकल्याचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. पोंभुर्णा शहरात अशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रुग्णाच्या सेवेसाठी असलेली १०८ ची रुग्णवाहिका ही तीन तास उशिरा आली. त्यात डॉक्टरही नसल्याने व वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने मानवचा मृत्यू होणे ही दुर्दैवी व गंभीर घटना आहे. संबंधित वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.

- अविनाश वाळके, युवा नेते, वंचित बहुजन आघाडी, पोंभुर्णा

मुलाला ग्रामीण रुग्णालयात आणले होते. तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती. त्या अगोदर त्याचा खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होता. उपस्थित डॉक्टरांनी मुलाची तपासणी करून त्याला चंद्रपूरला रेफर केले होते. ॲम्बुलन्स पोंभुर्ण्यात हजर नसल्याने ती बाहेरून येईपर्यंत उशीर झाला. पण यात कोणतीही हयगय करण्यात आलेली नाही.

- डाॅ. संदेश मामीडवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा

रुग्णालयात मुलाला आणले होते, तेव्हा त्याची प्रकृती गंभीर होती. तपासणी केल्यानंतर वाफारा देऊन कफ काढण्यात आला होता. मात्र प्रकृती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच त्याला चंद्रपूरला रेफर करण्यात आले.

- डाॅ. किशोर वडपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा

Web Title: 2 year old boy became the victim of the laxity of the health department pombhurna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.