आमडी उपसा सिंचन योजनेचा २० वर्षांचा वनवास संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:18 AM2021-06-27T04:18:55+5:302021-06-27T04:18:55+5:30

१० गावांतील शेतकऱ्यांची जमीन येणार सिंचनाखाली : २० वर्षात १९.३९ कोटींची योजना पोहचली ९९ कोटींवर मंगल जीवने बल्लारपूर : ...

20 years of banishment of Amdi Upsa Irrigation Scheme will come to an end | आमडी उपसा सिंचन योजनेचा २० वर्षांचा वनवास संपणार

आमडी उपसा सिंचन योजनेचा २० वर्षांचा वनवास संपणार

Next

१० गावांतील शेतकऱ्यांची जमीन येणार सिंचनाखाली : २० वर्षात १९.३९ कोटींची योजना पोहचली ९९ कोटींवर

मंगल जीवने

बल्लारपूर : मागील २० वर्षांपासून तांत्रिक कारणाने अडकलेली बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव आमडी उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतीपथावर असून आता ही योजना पूर्णत्वाच्या टप्प्यावर आली आहे. यामुळे बल्लारपूर तालुक्यातील १० गावांतील अंदाजे एक हजार ८८६ शेतकऱ्यांच्या २ हजार ४६२ हेक्टर शेतींना सिंचनाची सोय होणार आहे.

याबाबतची नुकतीच तहसील कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाल्याची माहिती आहे. बल्लारपूर तालुक्यातील कोरडी पडत असलेली जमीन पाण्याखाली येणार की नाही या विचारात गुरफटलेल्या शेतकऱ्यांची भावना ओळखून राज्य शासनाने २००१ मध्ये आमडी पळसगाव उपसा सिंचन योजना मंजूर करून बळीराजाच्या आशा पल्लवित केल्या. यामुळे पळसगाव, आमडी, कळमना, किन्ही, केमतुकूम, दहेली, बामणी, दुधोली, कोर्टी मक्ता,कवडजई या दहा गावांतील १ हजार ८८६ शेतकऱ्यांची २ हजार ४६२ हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे.

मागील काही वर्षांपासून सतत होणाऱ्या नापिकीमुळे त्रस्त झालेले तालुक्यातील शेतकरी शेती विकू लागले आहे. अशात उपसा सिंचन योजनेच्या पूर्णत्वाने बळीराजाला बळ मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १० वर्षाआधी तत्कालीन राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष प्रमोद शेंडे व सिंचन राज्यमंत्री डॉ.अनिल देशमुख यांनी आमडी पळसगाव उपसा सिंचन योजना प्रकल्प त्वरित सुरू करण्याचे फर्मान काढले होते. त्यावेळेस या योजनेला १९.३९ कोटींचा निधी लागणार होता. आजघडीला मात्र हा खर्च वाढून ९९ कोटीपर्यंत गेला आहे. ॲड. बाबासाहेब वासाडे यांनीही हा प्रकल्प पूर्णत्वास यावा यासाठी २००६ मध्ये भरपूर प्रयत्न केले. परंतु हा प्रकल्प मधेच अडगळीत पडला व पूर्णत्वास येण्यासाठी १० गावांतील शेतकऱ्यांना २० वर्ष वाट पाहावी लागली आहे.

बॉक्स

अडथळा झाला दूर

एका व्यक्तीने आमडी येथील शेतातून जाणारी पाईप लाईन टाकण्यास अडथळा आणून काम थांबविण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार पाटबंधारे विभागाने बल्लारपूरचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली. ही तक्रार तहसीलदार संजय राईंचवार यांच्याकडे येताच त्यांनी मध्यस्थीने तोडगा काढला व उपसा सिंचन योजनाचे काम सुरू झाले आहे. आता ही योजना येत्या दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता लघु पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे.

कोट

हा प्रकल्प तालुक्यातील आमडी जवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या काठी आहे. ही योजना लवकरात सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीवर पंप बसवले आहे. परंतु नदीमधील अप्रोचचे काम व्हायचे आहे. पाईपमध्ये गाळ येऊ नये म्हणून स्ट्रक्चर बांधायचे आहे. बंद नलिका वितरण प्रणालीचा वापर करून शेतात पाणीपुरवठा होणार आहे. सध्या काम प्रगतीपथावर आहे.

-प्रमोदकुमार वाकुडे,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे विभाग,चंद्रपूर.

कोट

तालुक्यात कृषी विकासाची गती वाढवायची असेल तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना बळ दिले पाहिजे. त्यांच्या मनात आत्मविश्वास तेव्हाच जागेल, जेव्हा बहुप्रतीक्षित उपसा सिंचन योजना प्रत्यक्ष सुरू होईल.

-

संदीप वेटे, सरपंच, ग्रामपंचायत, पळसगाव.

कोट

आमडी उपसा सिंचन योजना बळीराजाच्या हितासाठी आहे. तालुक्यात बारमाही पाण्याची सोय नाही, सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. या प्रकल्पाचा बामणीच्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे.

-सुभाष ताजने,सरपंच, ग्रामपंचायत बामणी, दुधोली

Web Title: 20 years of banishment of Amdi Upsa Irrigation Scheme will come to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.