विसापुरातील २०० घरे धूरमुक्त
By admin | Published: June 13, 2017 12:32 AM2017-06-13T00:32:00+5:302017-06-13T00:32:00+5:30
तालुक्यातील विसापूर येथील २०० कुटूंबाना घरगुती गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले.
गॅस जोडणीचे वितरण : सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथील २०० कुटूंबाना घरगुती गॅस जोडणीचे वितरण करण्यात आले. यामुळे या घरातील चुली धुरमुक्त झाल्या असून महिलांना दिलासा मिळाला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बल्लारपूर वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाने केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाणी पुरवठा विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष तथा बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, बल्लारपूर तालुका भाजपाचे अध्यक्ष किशोर पंदीलवार, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, जिल्हा परिषद सदस्य अॅड. हरिश गेडाम, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, उपसरपंच सुनील रोंगे, विद्या गेडाम, अशोक थेरे यांची उपस्थिती होती.
यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, धुरामुळे घरात प्रदूषण वाढते. महिलांना डोळ्याच्या आजारांना सामोरे जाणे लागते. महिलांच्या जीवनात आत्मसन्मान जागविण्यासाठी विविध योजना आहेत. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी पंतप्रधान उज्वला गॅस जोडणी योजना कार्यान्वित करण्यात आली. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. जंगल तोड करुन सरपणासाठी जाण्याची वेळ महिलांवर येवू नये. त्यांची पायपीट होवू नये. घरातील धूर प्रदूषण टाळण्यासाठी गॅस जोडणी महत्वाची असल्याने त्यांनी सांगितले.
ज्या घरात गॅस जोडणी पूर्वीच देण्यात आली, त्या घरी दुसऱ्यांदा गॅस जोडणी देण्याचे कटाक्षाने टाळावे. गरजूनाच लाभ देण्यात यावा, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ना. बबनराव लोणीकर, चंदनसिंह चंदेल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावकऱ्यांसह लाभार्थि मोठ्या संख्येनी उपस्थित होते.