‘त्या’ तरुणीचे शिर शोधण्यासाठी २०० पोलिसांची फौज तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 11:07 AM2022-04-06T11:07:24+5:302022-04-06T11:38:53+5:30
शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना २४ तासांनंतरही यश आले नाही. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त नाही, यावरुन इतरत्र हत्या करून धड आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
भद्रावती (चंद्रपूर) : निर्वस्त्र अवस्थेत तरुणीचे शिरावेगळे धड आढळलेल्या घटनेला २४ तास लोटूनही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील पाेलीस अधिकाऱ्यांसह सुमारे २०० पोलीस या तपासात गुंतले आहेत. तपास कोणत्या दिशेने सुरू आहे, याबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात आहे.
मंगळवारी सायंकाळी नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी भद्रावती गाठून सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ते काय निर्देश देतात यावरून तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. तरुणीचे मुंडके कापूनही घटनास्थळी रक्त आढळले नाही, यावरुन इतरत्र हत्या करून धड आणून टाकल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच अतिशय क्रूर पद्धतीने खून केल्याची घटना सोमवारी भद्रावतीत उघडकीस आली. सुमारे २५ वर्षीय वयाच्या तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत धडापासून शिर वेगळे केलेला मृतदेह आढळला. या घटनेत मारेकऱ्यांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचा क्रूर पद्धतीने खून केला असावा, अशी चर्चा आहे; परंतु शिर न सापडल्याने मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना २४ तासांनंतरही यश आले नाही. ही तरुणी कोण आहे? याबाबत अद्याप कोणीही पुढे आले नाही. ही बाब तपासात मोठी अडसर ठरत आहे. पोलिसांनी सर्व बाजूने तपासाला गती दिलेली आहे. सुमारे २०० पोलीस अधिकारी व पोलीस या तपासात गुंतले आहेत. ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून नागपूरचे विशेष पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे हेसुद्धा भद्रावतीत दाखल झाले आहेत. फिंगरप्रिंट एक्स्पर्ट, फॉरेन्सिक टीम, श्वान पथक वेग वेगळ्या दिशेने तपास करीत आहेत, अशी माहिती ठाणेदार गोपाल भारती यांनी दिली.
शहरात अफवांना पेव
ही घटना उघडकीस आल्यापासून बेपत्ता असलेल्या मुलींबाबत चर्चांना पेव फुटले आहे. मात्र, अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. पोलिसांकडून बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे.
निर्वस्त्र छायाचित्र व्हायरल झाल्याने संताप
शिर नसलेल्या निर्वस्त्र मृतदेहाचे छायाचित्र काहींनी जणांनी समाज माध्यमांवर व्हायरल केले आहे. हे छायाचित्र पोलिसांसमक्ष काढले गेले आहे. या घटनेने जनमाणसांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. ज्यांनी हे छायाचित्र व्हायरल केले त्यांचा पोलिसांनी शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी राज्य महिला आयोग मुंबईच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयक वनिता घुमे, विवेकानंद स्पोर्टिंग क्लबचे राजेश मते, सामाजिक कार्यकर्ते विशाल बोरकर, डॉ. भीमराव आंबेडकर, युथ क्लबचे संदीप जीवने यांनी केली आहे.