महाशिवरात्री यात्रेची २०० वर्षांची परंपरा प्रथमच खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:49+5:302021-03-13T04:51:49+5:30
कोरोनामुळे शिवटेकडीवर यात्रा भरलीच नाही नागभीड : महाशिवरात्रीच्या पर्वावर येथील शिवटेकडीवर भरत असलेल्या यात्रेची २०० वर्षांची परंपरा यावर्षी प्रथमच ...
कोरोनामुळे शिवटेकडीवर यात्रा भरलीच नाही
नागभीड : महाशिवरात्रीच्या पर्वावर येथील शिवटेकडीवर भरत असलेल्या यात्रेची २०० वर्षांची परंपरा यावर्षी प्रथमच खंडित झाली.
गेल्या २०० वर्षांपासून येथील शिवटेकडीवर शिवजीचे मंदिर आहे. येथे असलेले शिवलिंग स्वयंभू आहेत.या टेकडीवर शिवजींच्या दर्शनासाठी भाविक वर्षभर येत असले तरी शिवरात्रीच्या दिवशी आणि नंतर येणाऱ्या दोन गुरूवारी याठिकाणी विशेष यात्रा भरत आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व नंतरच्या दोन गुरूवारी पंचक्रोशीतील हजारो भाविक यात्रेत सहभागी होऊन शिवजींचे दर्शन घेत असत.
महाशिवरात्रीच्या दिवशी अगदी पहाटेपासूनच भाविक टेकडीवर येऊन शिवजींचे व शिवलिंगाचे दर्शन घेत होते. दर्शन घेणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी हर हर महादेवचा जप होता. अनेकजण महादेवाची गाणी ही गात होते. यावेळी देण्यात येणाऱ्या हर हर महादेवच्या घोषणांनी आसमंत निनादून निघत होता.
नागभीड नगरपरिषदेने पुढाकार घेत मागील दोन वर्षापासून यात्रेदरम्यान विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून या यात्रेला महोत्सवाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न चालविला होता. या महोत्सवाला मागील दोन्ही वर्षी पंचक्रोशीतील भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. मागील वर्षी अमरनाथ येथील बर्फाच्या शिवलिंगाची प्रतिकृती, भूतबंगला, आनंद मेळा, सर्कस तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध कार्यक्रमांची जोड देण्यात आली होती. तब्बल १५ दिवस हा यात्रा महोत्सव चालला होता.
मात्र यावर्षी कोरोनाने या उत्साहावर आणि महोत्सवावर ही पाणी फेरले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी कायदा लागू करण्यात आल्याने दर्शनावरही मर्यादा घालण्यात आल्या. परिणामी दोनशे वर्षाची यात्रा परंपरा यावर्षी प्रथमच खंडित झाली.