२१ दिव्यांग जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:31 PM2019-02-10T22:31:07+5:302019-02-10T22:32:31+5:30
आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा यांच्या पुढाकाराने स्व. गौरव पुगलिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुगलिया कुटुंबाच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. यातून दिव्यांग बांधवांचे आयुष्य आणखी सुदृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे, ही बाब गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट वरोरा यांच्या पुढाकाराने स्व. गौरव पुगलिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुगलिया कुटुंबाच्या वतीने दिव्यांग बांधवांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जात आहे. यातून दिव्यांग बांधवांचे आयुष्य आणखी सुदृढ करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे, ही बाब गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन माजी खासदार गेव्ह आवारी यांनी केले.
चंद्रपूर येथील एका खासगी लॉनमध्ये आयोजित या दिव्यांगांच्या सामूहिक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी २१ दिव्यांग जोडपी विवाहबध्द झाली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अनिस अहमद, राहुल पुगलिया, निलम राचर्लावार आदी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री अनिस अहमद यांनी ट्रस्ट आणि पुगलिया परिवाराच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे कौतुक केले. मान्यवरांच्या भाषणानंतर जिल्ह्यातील विविध गावातील २१ दिव्यांग जोडप्यांचा त्यांच्या रितीरिवाजानुसार विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर प्रत्येक जोडप्यांना आस्था बहुउद्देशिय चॅरिटेबल ट्रस्ट व पुगलिया परिवाराच्या वतीने संसार उपयोगी भेटवस्तू देण्यात आल्या. मागील १४ वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू असून आतापर्यंत सुमारे तीनशे जोडपी अशा सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द झाली आहेत. यावेळी नरेंद्र पुगलिया, नगिना पुगलिया, अरुण बाफना, गुंजन बाफना, संस्थाध्यक्ष संजयकुमार पेचे, आतिश आक्केवार, महेश भगत आदी उपस्थित होते.