सहा विधानसभांच्या २११ मतदान केंद्रांची होणार पुनर्रचना; प्रस्तावित केंद्रांची यादी जाहीर
By राजेश मडावी | Published: September 25, 2023 05:31 PM2023-09-25T17:31:09+5:302023-09-25T17:32:57+5:30
राजकीय पक्षांकडून २८ सप्टेंबरपर्यंत मागविल्या सूचना
चंद्रपूर : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ (अर्हता १ जानेवारी २०२४ वर आधारित) अंतर्गत मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम सहा विधानसभा मतदारसंघांतील २ हजार ३२ यादी भागांमध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनाही केल्या जाईल. त्यामुळे मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून जिल्हा निवडणूक विभागाने २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत सूचना मागविल्या. बदल झालेल्या व अस्तित्वातील मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत गृहभेटीचा उपक्रम राबविण्यात आला. २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर २०२३ कालावधीत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचनाही होणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून आलेले प्रस्तावित बदल हे सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर या कार्यालयास प्राप्त झाले आहेत.
हे प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडून राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. बदल झालेल्या व अस्तित्वातील मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सूचना द्यावयाची असल्यास २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
असे आहेत प्रस्ताव
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे १३७ प्रस्ताव, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे ५४ प्रस्ताव, विलीन (मर्ज) केलेले मतदान केंद्र प्रस्ताव तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एका मतदान केंद्रांवरील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणारे ११ मतदान केंद्र असे एकूण २११ मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरण व पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
"छायाचित्र मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमानुसार, १७ ऑक्टोबर २०२३ रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. नमूद बदलाचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाकडून मंजूर झाल्यास एकत्रित प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत बदल अमलात येतील. त्याआधारे मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना होणार आहे."
- अश्विनी मंजे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), चंद्रपूर