२१ व्या शतकातही ग्रामिणांचा नावेतून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:56 PM2019-03-04T22:56:38+5:302019-03-04T22:57:02+5:30
चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पारडी (खातेरा) घाटावर पूल नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र पुलाच्या निर्मितीची मागणी प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनच भागवली जात असल्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे.
जयंत जेनेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पारडी (खातेरा) घाटावर पूल नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र पुलाच्या निर्मितीची मागणी प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनच भागवली जात असल्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव येथे प्रकर्षाने जाणवत आहे.
नदीच्या उत्तर भागाला यवतमाळ जिह्यातील वणी व झरी जामणी तर दक्षिण भागाला कोरपना तालुका आहे. या परिसरातील जवळपास ५० ते ६० गावाचा सबंध कोरपना व मुकुटबन बाजारपेठेशी जोडला गेला आहे. या दोन्ही शहराचे येथून अंतर अत्यल्प आहे. परंतु पुलाअभावी हे अंतर अधिक पडत असून नदीला पाणी जास्त असल्यास वेळाबाई मार्गे प्रवास करून सदर शहरे नागरिकांना गाठावी लागत आहे. या पुलाच्या निर्मितीसंदर्भात अनेकदा नागरिकांकडून मागणी करण्यात आली. यावर मंजुरीच्या घोषणासुद्धा प्रसार माध्यमातून झळकल्या. मात्र अद्यापही पुलाचा श्रीगणेशा झाला नाही. त्या कारणाने पूल होणार की नाही, याबाबत नागरिकात संभ्रम कायम आहे. याच नदीवरील या पुलाच्या मागणीनंतर कोडसी (खु), वनोजा व तेलंगणाला जोडणारा दिग्रस पूल हे तयार झाले. मात्र पारडी घाट उपेक्षितच आहे.
पूल झाल्यास होऊ शकते औद्योगिक क्रांती
झरी तालुक्यातील मुकुटबन येथे बिरला ग्रुपचा सिमेंट प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पासाठी अतिरिक्त कच्चा माल हा कोरपना भागातच मुबलक उपलब्ध आहे. तेव्हा या घाटावर पूल झाल्यास वाहतूकदृष्ट्या सोयीचे होईल व दोन्ही भागातील गावात औद्योगिक विकास साधला जाईल. शिवाय कोरपना भागातील जनतेला माजरी - आदिलाबाद - नांदेड रेल्वे मार्गावरील मुकुटबन रेल्वे स्थानक प्रवासयोग्य जवळचे रेल्वे स्थानक पडेल.