जिल्ह्यात 22,103 मतदारांनी बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 05:00 AM2020-12-02T05:00:00+5:302020-12-02T05:00:31+5:30
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी चंद्रपूर शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कूल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भद्रावती, राजुरा, गडचांदूर व तालुक्याती इतर मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत जिल्ह्यातून सुमारे ६७.४७ टक्के मतदान करण्यात आले. २२ हजार १०३ मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. निवडणुकीसाठी उभे असलेल्या १९ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.
जिल्ह्यात २२ हजार ३३ पुरूष, १० हजार ७२३ स्त्री व इतर ५ असे ३२ हजार ७६१ पदवीधर मतदार होते. त्यापैकी सुमारे १५ हजार ६५८ पुरूष, ६ हजार ४४४ स्त्री व इतर १ अशा एकूण २२ हजार १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी चंद्रपूर शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कूल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भद्रावती, राजुरा, गडचांदूर व तालुक्याती इतर मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली. हॅन्ड सॅनिटराईज केल्याशिवाय मतदान कक्षामध्ये मतदारांना प्रवेश नव्हता. जिल्ह्यात सकाळी १० वाजतापर्यंत ७. ७७ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत १८.९४ टक्के, दुपारी २ वाजेपर्यंत ३६.८९ टक्के, ४ वाजेपर्यंत ५४.१६ टक्के तर ५ वाजेपर्यंत सुमारे ६७.४७ टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी बुधवारी समजेल.
अनेकजण मतदानापासून वंचित; आमदार धोटेंची तक्रार
कोरपना : प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेके पदवीधर मतदारांना मतदानापासून वंचित राहिल्याची तक्रार आमदार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.
आमदार धोटे यांच्या तक्रारीनंतर गडचांदूर व राजुरा मतदान केंद्रावर अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भेट दिली. मतदान प्रक्रियेचा वेग वाढविण्यात यश आले नाही. निवडणूक आयोगाने चाैकशी करण्याची मागणी आमदार धोटे यांनी केली आहे.
मत बाद होण्याच्या भीतीमुळे नवीन मतदार गोंधळले
पदवीधर मतदार संघाच्या एकाच उमेदवारासमोर १, २, ३ असा पसंतीक्रम नोंदविल्यास ते मत अवैध ठरते. मतदान केंद्रातील जांभळ्या शाईच्या पेनाने पसंतीक्रम लिहिण्याच्या सूचना मतदारांना देण्यात आल्या. अन्य पेनने पसंतीक्रम लिहिल्यास मत अवैध ठरते. एकल संक्रमणीय पद्धतीने पसंतीनुसार मतदान करण्याचा नियम आहे. त्यामुळे मत बाद होण्याच्या भीतीने नवीन मतदारांमध्ये संभ्रम झाल्याची माहिती मतदारांनी ‘लोकमत’ला दिली.