२२८२ पोलिओ लसीकरण केंद्र
By admin | Published: January 13, 2017 12:27 AM2017-01-13T00:27:37+5:302017-01-13T00:27:37+5:30
जिल्ह्यात पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी २९ जानेवारी रोजी महानगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभरातील ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलीओ डोज पाजण्यात येणार आहे.
२९ जानेवारीला मोहीम : १२५ मोबाईल पथकांची व्यवस्था
चंद्रपूर : जिल्ह्यात पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी २९ जानेवारी रोजी महानगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभरातील ० ते ५ वयोगटातील मुलांना पोलीओ डोज पाजण्यात येणार आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी घेण्यात आली.
यावर्षीची पहिली फेरी २९ जानेवारी रोजी राबविण्यात येणार असून त्यानंतर ग्रामीण भागात ३१ जानेवारी ते ४ फेब्रुवारी असे पाच दिवस तर शहरी व महानगरपालिका भागात पाच दिवस घरोघरी जावून लस पाजण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रत्येक गावात किमान एक या प्रमाणे १९८३, शहरी भागात १६५ व महानगरपालिका क्षेत्रात १३४ असे एकूण २२८२ लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलिओ लस मिळावी, यासाठी ग्रामीण भागात ९६, शहरी भागात ११ व महानगरपालिका क्षेत्रात १८ अशा एकूण १२५ मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे.
टोल नाका, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, यात्रास्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुध्दा ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रात १७८ ट्राझिंट टीमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केली आहे. आयपीआय मोहिमेमध्ये घरोघरी जावून लस पाजण्याकरिता १०८८ ग्रामीण, १३४ शहरी व १८४ महानगरपालिका क्षेत्र अशा एकूण १४०६ पथकांची व्यवस्था केलेली आहे. या मोहिमेकरिता ग्रामीण भागात ४४८९, शहरी भागात ४६३ व महानगरपालिका क्षेत्रा ४०० असे एकूण ५३५२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून ग्रामीण भागाकरीता ३९७ व शहरी भागाकरीता ३३ तर महानगरपालिका क्षेत्राकरिता २७ असे एकूण ४५७ पर्यवेक्षकांची नियुक्त करण्यात आली आहे. पल्स पोलिओ मोहिमेमध्ये रोटरी क्लब व जेसीस सारख्या सेवाभावी संस्थांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेतला असून सेवाभावी संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.(प्रतिनिधी)