आरोग्य सेवेसाठी पुन्हा नवीन 23 रुग्णवाहिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:00 AM2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:30+5:30
कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव थोपविण्याकरिता या रुग्णवाहिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे. २३ रुग्णवाहिकांपैकी २० रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला तर उर्वरित ३ रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोविड संक्रमणाच्या काळात रुग्णवाहिकांची संख्या वाढविल्यानंतर पुन्हा २३ अद्ययावत २३ रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्या. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मंगळवारी रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पोलीस ग्राउंड, चंद्रपूर येथे पार पडला. या रुग्णवाहिकांमुळे आरोग्य सेवा विस्तारात मोठी वाढ झाली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कोविड-१९ च्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य प्रसार व प्रादुर्भाव थोपविण्याकरिता या रुग्णवाहिकांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी व दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी या रुग्णवाहिकांची मदत होणार आहे. २३ रुग्णवाहिकांपैकी २० रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्राला तर उर्वरित ३ रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत जिल्ह्याला ४७ रुग्णवाहिका व ३० लसीकरण वाहने अशी एकूण ७७ वाहने आरोग्य सेवेसाठी उपलब्ध झाली आहेत. त्यापैकी २० रुग्णवाहिका खनिज निधीतून, ७ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून, २७ रुग्णवाहिका महापारेषण विभागाकडून तर २३ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत.
१ हजार ३५० शाळा सुरू
- दीड वर्षानंतर प्राथमिक व माध्यमिक मिळून १३५० शाळा सुरू करण्यात आल्या. पहिल्या दिवशी १ लाख ५ हजार ६११ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
- शाळा सुरू करण्याअगोदर शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले.
- ११ हजार ५५१ शिक्षकांपैकी ११ हजार ३१० शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी धान खरेदी, रबी उपाययोजना, घरकुल व डाटा एन्ट्री ऑपरेटर, वणी, वरोरा– माढेळी वळण रस्ता भूसंपादन तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत आढावा घेण्यात आला.
मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध
रबी हंगामात युरिया तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी रबी उपाययोजना बैठकीत दिली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, पणन अधिकारी अनिल गोगिरवार, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी उपस्थित होते. खरीप हंगामात ५९,५०८ टन तर रबी हंगामात २८,८९४ टन युरिया उपलब्ध झाला आहे, पणन महासंघाकडून २७ हजार ८७० शेतकऱ्यांकडून ८ लाख ७० हजार क्विंटल तर आदिवासी सोसायटीकडून ३ लाख २० हजार क्विंटल धान खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली.