शिबिरात काढली २३२ बँक खाती
By admin | Published: January 25, 2017 12:51 AM2017-01-25T00:51:56+5:302017-01-25T00:51:56+5:30
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिर वायगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात नुकतेच पार पडले.
आयटीआय रासेयो : कॅशलेस व्यवहाराचे शेतकऱ्यांना धडे
चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिर वायगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात नुकतेच पार पडले. वित्तीय साक्षरता अभियानांतर्गत जिल्हा अग्रणी बँक, बँक आॅफ महाराष्ट्र व लोहारा शाखा यांच्या संयुक्त उपक्रमातून गावातील शेतकऱ्यांची २३२ बँक खाती काढण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी आर.एस. आनंदपवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य नितीन जुनोनकर होते. प्रमुख पाहुणे सरपंच राखी गेडाम, मुख्याध्यापक जे.डी. पोटे, पंचफुला ढोके, सुनंदा पेंदाम, सरू वेलादी, प्रमोद मडावी, हर्षणा बागडे, बी.बी. वाभिटकर, चिन्नाजी गेडाम, माधुरी पेंदाम, सूर्यभन पेंदाम, मारोती ढुमणे संघर्ष कुंभारे आदी उपस्थित होते.
स्वच्छता अभियानांतर्गत गावातील पाच विहिरी व आठ बोरवेलच्या जलस्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करून त्याचे फलक लावण्यात आले. तपासणी अहवाल प्राचार्य नितीन जुनोनकर यांनी सरपंच व ग्रामसचिवांच्या सुपूर्द केला.
व्यसनमुक्ती अभियानांतर्गत दोन फलक गावातील मुख्य चौकात लावण्यात आले. त्यानंतर सहा कचरा कुंड्या मुख्य ठिकाणी लावण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता प्रदीप अडकीने यांचे अंधश्रद्धा निर्मूलनावर मार्गदर्शन झाले. जिल्हा परिषदेच्या सहकार्यातून महिला व बाल आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर डॉ.माधुरी मेश्राम, डॉ. संगिता जयस्वाल, डॉ. रायपुरे व चमूच्या मार्गदर्शनात झाले.
सर्वचिकित्सालयातर्फे पशुधन चिकित्सा व मार्गदर्शन शिबिर डॉ. एच. एस. वरठी, डॉ.गणेश ठाकूर, डॉ. पी. डी. कडूकर व चमूद्वारे पशुधनाची तपासणी व चिकित्सा करण्यात आली. स्वच्छता अभियान राबविण्याकरिता उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (बफर) व इको डेव्हलपमेंट समिती यांनी विशेष सहकार्य केले.
समारोपीय समारंभादरम्यान प्राचार्य जुनोनकर यांच्या अर्धांगिनी रत्नमाला जुनोनकर यांच्याकडून वयोवृद्ध व गरीब सात महिलांचा सत्कार करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर मद्देलवार, संचालन विकास जयपूरकर, आभार अमित शेंडे यांनी मानले. (प्रतिनिधी)
गावकऱ्यांना विनामूल्य सेवा उपलब्ध
स्वच्छता अभियानांतर्गत विहिरी व गावातील सांडपाण्याच्या ठिकाणी सर्वेक्षण करून तीन ग्रामपंचायत विहिरीजवळ शोष खड्डे निर्माण केले. तसेच गावात १२ शोष खड्डे तयार करून तसे फलक लावण्यात आले. या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात होणारी सांडपाण्याची विल्हेवाट व दुर्गंधी कमी होणार आहे. गावातील जनतेचे विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स दुरुस्ती, पेंटींग, वेल्डींगची कामे, प्राथमिक शाळेची रंगरंगोटी स्लोगन, गवंडी व वेल्डिंगची कामे, ग्रामपंचायतची रंगरंगोटी व सूचना फलकाची कामे आदी अंदाजे १ लाख ४० हजारांची कामे विनामूल्य करण्यात आली.
वित्तीय साक्षरतेचे मार्गदर्शन
यावेळी बँक खाते काढलेल्या खातेदारांना रूपे कार्ड व पॅन कार्ड प्रस्तावित असून पुढील ते एक महिन्यात दिले जातील. या उपक्रमात जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ईश्वर गिरडकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक तापसकुमार शाहू आणि शाखा व्यवस्थापक उज्ज्वला देवगडे व लोहाराचे नरेश आत्राम यांनी वित्तीय साक्षरता अभियान व कॅशलेस प्रणालीकरिता मार्गदर्शन केले.