जिल्हा कारागृहासाठी २४ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:17 AM2018-09-13T00:17:27+5:302018-09-13T00:18:01+5:30
राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील टाईप २ ची ३६ व टाईप ३ च्या चार निवासस्थानांच्या बांधकामासाठी नऊ कोटी ९० लाख ४७ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हा कारागृह परिसरातील टाईप २ ची ३६ व टाईप ३ च्या चार निवासस्थानांच्या बांधकामासाठी नऊ कोटी ९० लाख ४७ हजार रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे जिल्हा कारागृह परिसरात अतिरिक्त ५०० बंदीवान राहतील, अशा पध्दतीच्या बॅरेकचे बांधकाम व इतर पुरक बांधकामासाठी १४ कोटी २२ लाख ७५ हजार रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
जिल्हा कारागृहाच्या आस्थापनेवर एकूण ८१ पदे मंजूर असून अधिकारी व कर्मचारी यांच्या वास्तव्याकरिता सद्यस्थितीत २२ निवासस्थाने उपलब्ध आहेत. त्यापैकी १२ निवासस्थाने वास्तव्यास योग्य आहे. १० निवासस्थाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्लेखित करण्यात आलेली आहे. सदर कारागृहातील निर्लेखित करण्यात आलेल्या निवासस्थानसह इतर निवासस्थाने बांधण्याच्या दृष्टीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने प्रस्ताव गृह विभागाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार टाईप २ ची ३६ व टाईप ३ ची चार निवासस्थाने बांधण्यासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे.
जिल्हा कारागृहात बंदी बांधवांना राहण्याच्या दृष्टीने होत असलेली अडचण लक्षात घेता पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार ५०० अतिरीक्त बंदीवान राहतील, अशा पध्दतीचे बॅरेक व इतर पूरक बांधकाम करण्यासाठीचा प्रस्ताव गृह विभागाला सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने बांधकामासाठी १४ कोटी २२ लाख ७५ हजार रू. मंजूर केले आहे.