सात महिन्यात जिल्ह्यात २४ खून
By admin | Published: June 14, 2014 11:26 PM2014-06-14T23:26:36+5:302014-06-14T23:26:36+5:30
गेल्या सात महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २४ खून झालेत. यातील सर्वाधिक हत्या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. जानेवारी ते जून या सात महिन्यांतील पोलीस दप्तरातील आकडेवारीवर नजर फिरविली असता,
गुन्हेगारी फोफावतेय: कौटुंबिक कारणातून सर्वाधिक हत्या
चंद्रपूर : गेल्या सात महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २४ खून झालेत. यातील सर्वाधिक हत्या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. जानेवारी ते जून या सात महिन्यांतील पोलीस दप्तरातील आकडेवारीवर नजर फिरविली असता, हे वास्तव पुढे आले. जिल्ह्यातील चिमूर व सावली तालुक्यातील सर्वाधिक खुनाच्या घटना घडल्या आहेत, तर जिवती आणि कोरपना तालुक्यात सात महिन्यांच्या कालावधीत हत्येची एकही घटना घडली नाही, हे विशेष.
चंद्रपूर जिल्हा हा उद्योगाने व्यापलेला जिल्हा आहे. त्यामुळे परप्रांतिय मजूर वर्ग येथे मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख मोठा असला तरी घटना उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाली आहे. शुक्रवारी सकाळी चंद्रपुरातील मुख्य मार्गावर असलेल्या मनपाच्या राजे धर्मराव विद्यालयाच्या मागील इमारतीच्या बोळीत एका इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास काही तासांतच उरकवून आरोपीला जेरबंददेखील केले. जिल्ह्यात सात महिन्यांच्या कालावधीत २४ खुनाच्या घटना घडल्या. त्यात चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, सावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोखाळा, किसाननगर, चकपिरंजी, सावली येथे प्रत्येकी एक खुनाची घटना घडली. या सर्व घटना उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या चार घटना घडल्या. खांबाडा, मुरपार, तळोधी (नाईक), वडाळा या गावांमध्ये या घटना घडल्या. या सर्व घटना उघडकीस आल्या. आरोपींना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)