मूल तालुक्यात मोफत धान्याचे २४ हजार ३४५ लाभार्थी कुटुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:40+5:302021-09-03T04:28:40+5:30
राजू गेडाम मूल : कोरोनामुळे गरिबांचे रोजगार हिरावून घेतल्याने अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. आर्थिक पाया डगमगला असताना ...
राजू गेडाम
मूल : कोरोनामुळे गरिबांचे रोजगार हिरावून घेतल्याने अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. आर्थिक पाया डगमगला असताना शासनाने सर्वसामान्यांची भूक मिटविता यावी, यासाठी मे ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्याअनुषंगाने मे महिन्यापासून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला मोफत गहू व तांदळाचे वितरण सुरू आहे. मूल तालुक्यात २४ हजार ३४५ लाभार्थी कुटुंब असून महिन्याला ४ हजार ३६३ क्विंटल धान्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात अनेकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाची दुसरी लाट मार्च २०२१ आल्यानंतर सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. सर्वसामान्य जनतेचा रोजगार गेल्याने आर्थिक संकट ओढवले होते. त्यामुळे शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देत मे ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखावली गेली. मूल तालुक्यात धान्य लाभार्थी कुटुंब संख्या २४,३४५ असून यात अंत्योदयचे ८,१५१ तर प्राधान्य कुटुंबाचे १६,१९४ लाभार्थी कुटुंब आहेत. शासनाने एका व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. यात एका महिन्याला अंत्योदय कुटुंबातील व्यक्तीला ८६०.७३ क्विंटल गहू तर ५७३.८२ क्विंटल तांदूळ दिले जात आहेत. तसेच प्राधान्य कुटुंबाच्या व्यक्तीला १७५८.५७ क्विंटल गहू व ११७२.३८ क्विंटल तांदूळ वितरण केला जात आहेत. एकंदरीत २४ हजार ३४५ कुटुंब लाभार्थींना दर महिन्याला ४ हजार ३६३ क्विंटल मोफत धान्याचे वितरण केले जात आहे.
कोट
कोरोनाच्या काळात कुणीही अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला मोफत गहू व तांदूळ दिले जात आहेत. नोव्हेंबर २१ पर्यंत ते दिले जाणार आहे. रेशन दुकानात धान्य दर महिन्याच्या ५ ते ६ तारखेपर्यंत पोहोचत असते. कुटुंबप्रमुखाच्या बोटाचे ठसे घेतल्याशिवाय धान्य वाटप केले जात नसल्याने लाभार्थी कुटुंबांनी महिन्याच्या ३० तारखेपर्यंत नेणे आवश्यक आहे.
-डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, मूल.