'त्या' २४ गावांना मिळणार गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी; विजय वडेट्टीवार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2022 02:00 PM2022-02-11T14:00:15+5:302022-02-11T14:08:02+5:30

गुरुवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध जलसिंचन प्रकल्पांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या समस्या मांडल्या.

24 villages will get water from gosikhurd project in bramhapuri tehsil | 'त्या' २४ गावांना मिळणार गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी; विजय वडेट्टीवार यांची माहिती

'त्या' २४ गावांना मिळणार गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी; विजय वडेट्टीवार यांची माहिती

Next
ठळक मुद्देमुंबईत आढावा बैठकप्रस्तावाची तयारी : उपसा योजनेतून ५५०० हेक्टर क्षेत्रात सिंचन

चंद्रपूर : गोसेखुर्द जलसिंचन प्रकल्पातील उजव्या मुख्य कालव्यातील पाणी ब्रह्मपुरी तालुक्यात उंचावर असलेल्या २४ गावातील शेतकऱ्यांना मिळत नव्हते. त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी दिले. मंजुरी मिळताच साडेपाच हजार हेक्टरवर सिंचनाची सोय उपलब्ध होणार आहे.

मंत्रालयात गुरुवारी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत विविध जलसिंचन प्रकल्पांबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या समस्या मांडल्या. यावेळी लघु पाटबंधारे विभागाचे उपसचिव अमोल फुंदे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर. डी. मोहिते (दूरदृश्य प्रणालीद्वारे), गोसेखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता देवगडे उपस्थित होते.

गोसेखुर्द जलसिंचन प्रकल्पाची माहिती देताना ना. वडेट्टीवार म्हणाले, संपूर्ण उपसा सिंचन योजना विजेवर चालते. वीज बिलाचे पैसे भरले जात नाही. काही वर्षांनंतर सिंचन योजना बंद पडतात. ही उपसा सिंचन योजना सोलरवर सुरू केल्यास विजेची बचत होईल. शेतकऱ्यांना भुर्दंड बसणार नाही. उपसा सिंचन योजना सुरू राहून शेतकऱ्यांना बारमाही पाणी मिळेल. या परिसरातील उपसा जलसिंचन योजना डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही ना. वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

निधी कमी पडू देणार नाही - जलसंपदामंत्री जयंत पाटील

मेंढकी व अड्याळ उपसा सिंचन योजनेस निधीसह आसोलामेंढा धरणाच्या उंची वाढ कामास मान्यता देऊ. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर आसोलामेंढा प्रकल्पातील जमीन पर्यटनासाठी व हरणघाट सिंचन योजनेच्या विविध कामांना मंजुरीबाबत प्रस्ताव नियामक मंडळास सादर करावा. निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

लाभक्षेत्रातील गावे

मेंडकी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात मेंडकी, माणिकपूर रिठ, गणेशपूर, नवेगाव खुर्द, कोरेगाव रिठ, शिवसागर तुकुम, शिवसागर गावगल्ला, रुद्रापूर-भानापूर ही गावे समाविष्ट आहेत. लागवड क्षेत्र २ हजार ५१ हेक्टर आहे. अड्याळ योजनेच्या क्षेत्रात अड्याळ तुकूम, अड्याळ गावगन्ना, चोरटी, वायगाव, भगवानपूर, साखरा, साखराचक, रानपरसोडी, दुधवाही, चांदगाव, धमणगाव, हत्तीलेंढा, पारडी, कोसंबीचक, नवेगावपांडव, किरमिटी, वसाळामक्ता, भिकेश्वर, गोवारपेठ, तेलनडोंगरी ही गावे समाविष्ट आहेत. लागवडीलायक क्षेत्र ३ हजार ५०० हेक्टर आहे.

Web Title: 24 villages will get water from gosikhurd project in bramhapuri tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.