बेलगावात डेंग्यूचे २५ रुग्ण
By admin | Published: August 26, 2014 11:20 PM2014-08-26T23:20:31+5:302014-08-26T23:20:31+5:30
तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे डेंग्यूची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून गावातील अनेक रुग्ण आजाराने फणफणत आहे. दरम्यान हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीचा
गावात भीतीचे वातावरण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील बेलगाव (कोलारी) येथे डेंग्यूची लागण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून गावातील अनेक रुग्ण आजाराने फणफणत आहे. दरम्यान हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीचा मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने रुग्णांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी पाठविले असून यातील काही रुग्ण पॉझेटिव्ह असल्याचे समजते. काही रुग्णांनी शहरातील खासगी डॉक्टरकडेही उपचार सुरु केले आहे. गावात धुरफवारणी करण्यात आली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.
ब्रह्मपुरीपासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या बेलगावात घाणीचे साम्राज्य आहे. गावात मागील काही दिवसांपासून रुग्ण तापाने फणफणत आहे. काही रुग्णांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. काही रुग्णांनी अऱ्हेरनवरगाव प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरु केला आहे. दरम्यान गावातील हेमलता उत्तम मेश्राम(१९) या युवतीला ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचारसाठी नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान नागपूर येथे तिचा मृत्यू झाला.यामुळे गावात अधिकच भितीचे वातावरण पसरले आहे.
आरोग्य विभागाने गावातील २७ रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. यातील २ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले तर याच गावातील ११ रुग्ण ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात ऋतुजा बोरकर, रिचा बोरकर, शुभांगी बोरकर या एकाच घरातील तिन सदस्यांवर उपचार सुरु आहे. पायल डोमा वासनिक, मंगेश अशोक मेश्राम, दिपा केवळ मेश्राम, सुहास अनिल बोरकर, उज्ज्वला अनिल बोरकर, राजनंदनी जयपाल बोरकर, सुनिता जयपाल बोरकर आदी ग्र्रामस्थ मागील आठ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात प्रचंड प्रमाणात घाण साचली आहे. येथे शासनाने शौचलय बांधून दिले आहे. यातील काही शौचालय कागदोपत्री आहे. त्यामुळे नागरिक शौचास उघड्यावर जातात. तसेच नाल्यांची योग्य व्यवस्था नसल्यानेही ठिकठिकाणी पाणी जमा होत आहे. त्यामुळे गावात आजाराचे प्रमाण वाढले आहे. दररोज डेंग्यू व इतर तापांनी रुग्ण बेजार झाले आहेत.
गावामध्ये किटकनाशक फवारणी केली जात असली तरी पाहिजे तशी स्वच्छता नसल्यानेच आजारांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी आजाराविषयी ग्रामसभेत माहिती दिली. स्थानिक प्रशासनाने थातूरमातूर उपचार केला.
मात्र गावात स्वच्छता मोहीम राबविली नसल्यानेच आज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. शासकीय वैद्यकीय सुविधा व गावातील भितीचे असलेले वातवरण दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम होणे गरजेचे आहे.(प्रतिनिधी)