२५ टक्के ग्रामीण नागरिक निरक्षर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:22 PM2018-06-11T23:22:32+5:302018-06-11T23:22:44+5:30
राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.
मंगेश भांडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासन दरवर्षी प्रौढ शिक्षणावर लाखो रूपये खर्च करीत आहे. अशिक्षित नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी चंद्रपूर जिल्हा अद्यापही पूर्णत: साक्षर झालेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार २५ टक्के नागरिक निरक्षर असून १५ तालुक्यांपैकी चंद्रपूर तालुका साक्षरतेत आघाडीवर आहे. या तालुक्याची साक्षरतेची टक्केवारी ८७.०५ आहे. तर जिवती तालुक्याची टक्केवारी ६५़.०४ एवढी आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा साक्षरतेचा दर एकूण ८० टक्के आहे. यामध्ये पुरूष आघाडीवर असून पुरूषांच्या साक्षरतेची टक्केवारी ८६.०८ आहे. तर महिला साक्षरतेची टक्केवारी ७३ आहे. अशिक्षितांचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने निरंतर शिक्षण विभाग सुरू केले आहे. साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी लाखो रूपये आतापर्यंत खर्च करण्यात आले. मात्र खर्चाचा विचार केला तर जिल्हा १०० टक्के साक्षर व्हायला पाहिजे होता. मात्र जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व नियोजन शुन्यतेमुळे साक्षरतेच्या बाबतीत जिल्हा मागे पडल्याचे दिसून येते. यात महिलांचा आकडा सर्वाधिक आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख २८ हजार ९२९ आहे. यात महिला ७ लाख दोन हजार ८२३ तर पुरुष ७ लाख २६ हजार १०६ एवढे आहेत. लोकसंख्येच्या तुुलनेत साक्षरतेचा विचार केल्यास २५ टक्के ग्रामीण क्षेत्रातील आणि नागरी क्षेत्रातील १२ टक्के नागरिक अशिक्षीत आहेत. यात पुरुषांची तालुकानिहाय साक्षरता चंद्रपूर तालुका ९१.०८ टक्के, वरोरा तालुका ८९.०८ टक्के, चिमूर ८४.०४, नागभीड ८५.०४, ब्रह्मपुरी ८६.०३, सावली ८०.०४, सिंदेवाही ८६.०२, भद्रावती ९०, मूल ७९.०८, पोंभुर्णा ७८.०८, बल्लारपूर ९०.०५, कोरपना ८७.०१, राजुरा ८५.०१, गोंडपिंपरी ८०.०८ व जीवती तालुक्यात ७५.०२ टक्के पुरुष साक्षर आहेत.
७३ टक्के महिला साक्षर
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक निरक्षरतेचे प्रमाण महिलांमध्ये आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ८३ टक्के महिला साक्षर असून वरोरा तालुका ७८ टक्के, चिमूर ७०.०३, नागभीड ६७.०६, ब्रह्मपुरी ७०, सावली ५९.६, सिंदेवाही ६७.०२, भद्रावती ७८, मूल ६३.०९, पोंभुर्णा ६२, बल्लारपूर ७७.०८, कोरपना ७४.०७, राजुरा ७२.०४, गोंडपिंपरी ६२.०९ व जिवती तालुक्यात केवळ ५५.०२ टक्के महिला साक्षर आहेत.