'शिवसेनेत प्रवेशासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल 25 वेळा फोन आला'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 09:26 AM2019-08-02T09:26:17+5:302019-08-02T09:27:07+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला नाही त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत सत्ताधारी पक्षात सामील झाले.
चंद्रपूर - राज्याच्या राजकारणात सध्या पक्षांतराचे जोरदार वारे वाहू लागले आहे. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपाने गळाला लावून त्यांना मंत्रिमंडळात गृहनिर्माण मंत्री म्हणून स्थान दिलं. भाजपा आणि शिवसेनेत पक्षप्रवेशासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. पक्षांतर करणारे नेते गळाला लावण्यासाठी भाजपा-शिवसेनेतही चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेवर खळबळजनक दावा केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, मला शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी मातोश्रीवरुन वारंवार फोन येत आहेत. काही दिवसांपासून वर्षावरुन आणि वांद्रेयेथून येणारे फोन जास्त आहेत. मला भेटायला बोलवत आहेत. एक विरोधी पक्षनेता भाजपात गेला म्हणून दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत न्यायचा आहे असा दावा त्यांनी केला.
तसेच वांद्रे येथून आतापर्यंत एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 25 वेळा फोन आल्याचंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला नाही त्यामुळे काँग्रेसचे बंडखोर नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा देत सत्ताधारी पक्षात सामील झाले. भाजपात येताच विखे पाटील यांना गृहनिर्माण मंत्री बनविण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील यांचा चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील हे भाजपाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून गेले आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, वैभव पिचड, संदीप नाईक तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, नवी मुंबईतील काही नगरसेवकांसह राज्यभरातून पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे सचिन अहिर, जयदत्त क्षीरसागर हे नेते शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे विरोधी पक्षातील जास्तीत जास्त नेते आपल्या पक्षात खेचण्यासाठी चढाओढ लागली आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यावर शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहणे गरजेचे आहे.