जिल्ह्यात २५० वाघ; नैसर्गिक अधिवास आला धोक्यात
By साईनाथ कुचनकार | Published: July 29, 2024 04:37 PM2024-07-29T16:37:36+5:302024-07-29T16:38:40+5:30
Chandrapur : २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दरवर्षी २९ जुलै रोजी वाघ संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. आज घडीला चंद्रपूर जिल्ह्यात २५० च्या वर वाघांचे वास्तव आहे. ताडोबामध्ये हमखास वाघांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची मोठी पसंती असते. मात्र जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वाघांना अधिवास कमी पडत आहे. परिणामी मानव वन्यजीव संघर्ष वाढत आहे. त्यामुळे ही बाब भविष्यासाठी मानव आणि वाघांनाही धोकादायक ठरू शकते. मागील काही वर्षांमध्ये मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी केली जात आहे. जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. वाघांच्या घरांमध्ये मानवाने अतिक्रमण केल्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे.
असे आहे वाघांचे वास्तव
जिल्ह्यात आजमितीस २५० च्या घरात वाघ आहेत. यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर-बफर क्षेत्रात जवळपास १० अधिक वाघ आहेत. ब्रह्मपुरी एकट्या प्रादेशिक वनक्षेत्रात ७० ते ८० वाघ आहे. त्याशिवाय मध्य चांदा वनविभाग क्षेत्रात १५- २० आणि चंद्रपूर वनविभाग अंतर्गत वनक्षेत्रात २०ते २५ वाघ आहे. याशिवाय कन्हारगाव अभयारण्यामध्ये १० ते १२ वाघ, तर घोडाझरी अभयारण्यमध्येसुद्धा अनेक वाघ आहेत. एफडीसीएमच्या वनक्षेत्रात १० ते १५ वाधाची संख्या आहे.
हमखास वाघांचे दर्शन
चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांना एक नजर बघण्यासाठी देशातीलच नाहीं तर विदेशातीलही पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथे हमखास वाघाचे दर्शन होते.
वाघ आपले अधिवास बदलतोय
"वाढत्या वाघांच्या संख्येसोबत त्यांना आवश्यक अधिवास कमी पडत आहे. त्यामुळे वाघाचा आपसातील संघर्ष वाढू लागला आहे. वाघांकडूनसुद्धा नवा अधिवास स्वीकारला जात आहे. यात विविध कारखान्याचे औद्योगिक क्षेत्र जसे सीटीपीएस, वेकोलिचे क्षेत्र आणि नदीपात्रांतील झाडेझुटूप असलेले क्षेत्रसुद्धा स्वीकारले जात आहे."
- बंडू धोतरे वन्यजीव अभ्यासक, चंद्रपूर
मानव - वन्यजीव संघर्ष वाढला
चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास दररोज वाघ-मानव संघर्षाच्या घटना घडत आहे. व्याघ्र जिल्हा म्हणून नावारूपास येताना वाढलेले वाघ आता वाघ - मानव संघर्षाच्या रूपाने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पूर्वी ताडोबाचे जंगल आणि काही ठराविक जंगलात असलेले वाद्यांचा आज जिल्ह्यात सर्वत्र सर्वदूर असलेल्या वनक्षेत्रात वावर दिसून येतात.