जिल्हा परिषद शाळांमधील २५८ वर्गखोल्या धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:19 AM2021-06-17T04:19:55+5:302021-06-17T04:19:55+5:30
चंद्रपूर : कोरोनाने ऑनलाईन अध्यापन सुरू झाले असले तरी जिल्ह्यातील १५१ जिल्हा परिषद शाळेतील साधारणत: २५८ वर्गखोल्या धोकादायक झाल्याचे ...
चंद्रपूर : कोरोनाने ऑनलाईन अध्यापन सुरू झाले असले तरी जिल्ह्यातील १५१ जिल्हा परिषद शाळेतील साधारणत: २५८ वर्गखोल्या धोकादायक झाल्याचे निर्लेखित करण्यात आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत, परंतु आता जर प्रत्यक्षात शाळा सुरु झाल्यास विद्यार्थ्यांना त्याच धोकादायक वर्गखोल्यात ज्ञानार्जन करावे लागणार असल्याचे वास्तव आहे.
दरवर्षी जुन्या इमारतींचा प्रशासनाकडून सर्व्हे करण्यात येतो. या अंतर्गत नादुरुस्त शाळा, वर्गखोल्यांची यादी तयार करण्यात येते. तसा प्रस्ताव संबंधित शाळेच्या इमारतीसाठी किती निधी आवश्यक आहे. याबाबत आराखडा तयार करून शिक्षण विभागातर्फे शासनाकडे सादर केला जातो. त्यानुसार धोकादायक वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी उपलब्ध करुन दिला जातो. त्यातून शाळातील वर्गखोल्यांची दुरुस्ती किंवा नव्याने बांधकाम केले जाते. सन २०२०-२०२१ मध्ये जिल्ह्यातील १५६० जिल्हा परिषदेच्या शाळांपैकी १५१ शाळेतील प्रत्येकी एक किंवा दोन अशा २५८ वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आल्या आहेत. यातील प्रस्ताव सादर झाल्यानंतर बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे काही वर्गखोल्यांचे बांधकाम झाले आहे. तर काहींचे प्रगतिपथावर आहे. जर आता शाळा सुरु झाल्या तर ज्या शाळेतील वर्गखोल्यांचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे, अशा शाळेतील त्याच धोकादायक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागणार आहे.
कोट
चंद्रपूर जिल्ह्यातील १५१ शाळांमधील २५८ च्या जवळपास वर्गखोल्यांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव आले आहेत. त्यातील काही वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर काहींचे काम प्रगतीपथावर आहे. सन २०१६ ते २०२० पर्यंत जिल्ह्यात ३४२ वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून २१२ वर्गखोल्यांचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हे बांधकाम पूर्ण होणार आहे.
-दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प. चंद्रपूर
बॉक्स
चार वर्षांत ५५४ वर्गखोल्यांचे बांधकाम
दरवर्षी जि. प. च्या शाळांचे निर्लेखन करण्यात येते. त्यानुसार निधी मंजूर झाल्यानंतर त्या वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येते. सन २०१६ पासून २०२० पर्यंत जिल्ह्यातील ५५४ शाळेच्या बांधकामास मंजुरी मिळाली. त्यापैकी ३४२ शाळेतील काम पूर्णत्वास आले आहे. तर २१२ वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. सन २०२१ मध्ये १५१ शाळांमधील २५८ वर्गखोल्यांचे प्रस्ताव आले असून काहींचे बांधकाम झाले आहे. तर काहींचे प्रस्तावित असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
बॉक्स
कोणत्या तालुक्यात किती धोकादायक
चंद्रपूर १२
बल्लारपूर ५
भद्रावती १२
ब्रह्मपुरी ३७
चिमूर १२
गोंडीपिपरी १
कोरपना ११
मूल २१
नागभीड ११
पोंभुर्णा १७
राजुरा ३६
सावली ६०
सिंदेवाही २०
वरोरा १३
----------
अशा शाळेत मुले पाठवायची कशी
मागील वर्षी कोरोनामुळे शाळा भरलीच नाही. यंदाही भरणार की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रशासनाकडे भरपूर वेळ आहे. तोपर्यंत शाळेची दुरुस्ती करावी. सध्या मुले घरीच असल्याने चिंता नाही;मात्र भविष्यात शाळा सुरु झाल्यास वर्गखोल्यांची अवस्था अशीच असेल तर मुलांना शाळेत कसं पाठवायचे, हा प्रश्न आहे.
-पालक
--------
एकीकडे कॉन्व्हेटच्या सुसज्ज व मोठ-मोठ्या इमारती उभ्या होत आहेत. तर जि. प. शाळेच्या इमारती धोकादायक आहेत. अनेकदा शाळेची भिंत कोसळून अपघात झाल्याच्या घटना ऐकावयास मिळतात. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून निर्लेखित वर्गखोल्यांचे नव्याने बांधकाम करणे गरजेचे आहे. शाळा बंद असल्याने प्रशासनाकडे दुरुस्तीसाठी बराच वेळ आहे.
-पालक