मुंडणाद्वारे २६२ जणांनी केला निषेध
By admin | Published: June 9, 2017 12:52 AM2017-06-09T00:52:24+5:302017-06-09T00:52:24+5:30
दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा- चंद्रपूर- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त
दिंदोडा बॅरेज प्रकल्प : जमिनी परत देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
व्वरोरा : दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वर्धा- चंद्रपूर- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी वर्धा- वणा नदींच्या संगमस्थळी विठ्ठल रुखमाई देवस्थान परिसरात महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर सामूहिक मुंडण सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली. या सत्याग्रहात २७२ शेतकऱ्यांनी आपले केस मुंडण करुन ते नदीपात्रात अर्पण केले.
महाराष्ट्रात सर्वत्र शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यात दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहीक मुंडण आंदोलनाची भर पडली. शेतकऱ्यांचे संपावर जाणे म्हणजे राज्यकर्त्यांनी वाटीत पाणी घेऊन बुडून मरण्यासारखे आहे. जर या संपाला सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर आज ज्या शेकडोंच्या संख्येने शेतकरी स्वत:चे केश मुंडण करुन आपले चेहरे विद्रूप करतायेत. तेच शेतकरी २०१९ ला मतदानरुपी वस्तऱ्याने राज्यकर्त्यांचे मुंडण केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते डॉ. मनोज तेलंग यांनी व्यक्त केली.
१९९९ पासून निप्पॉन डेन्ड्रो या वीज प्रकल्पाकरिता पाण्याची गरज असल्याचे भासवून चंद्रपूर - वर्धा - यवतमाळ या तीन जिल्ह्यांमधील ३२ गावांतील सुमारे १ हजार ५४० हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. १५ वर्षापासून या वीज प्रकल्पाचा पत्ता नाही. आता अचानक २०१६ मध्ये शासनाने याच अधिग्रहित जमिनी जलसंपदा विभागाला परस्पर हस्तांतरित केल्या.
याबाबत बाधीत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना देण्यात आली नाही. भूमी अधिग्रहण कायदा २०१३-१४ नुसार पाच वर्षांत संपादित जमिनीवर प्रस्तावित प्रकल्प झाला नाही, तर त्या जमिनी शेतमालकाला परत करण्याची तरतूद आहे. परंतु १५ वर्षांपासून न झालेल्या प्रकल्पाच्या जमिनीवरचे भूमी अधिग्रहण रद्द करुन त्या सन्मानाने शासनाने परत कराव्या किंवा जो भूमी अधिग्रहण कायदा-१८९४ शासनाने रद्द केला, ते भूसंपादन रद्द करावे. या आंदोलनात महिला-पुरुष, मुले-मुली असे संपूर्ण कुटुंबींयासह शेकडोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त आणि शेतमजूर, कारागीर आदी या सत्याग्रहात सहभागी झाले होते. दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष पुंडलिक तिजारे यांच्यापासून मुंडणाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्ष अभिजित मांडेकर, सचिव चंपत साळवे आणि सुजल तिजारे, अंकुश ठाकरे, प्रथमेश मांडेकर, कृष्णा मांडेकर, स्नेहल साळवे या पाच ते दहा वर्षांच्या अल्पवयीन मुला-मुलींसह सायंकाळी पाच वाजेपर्यंत २७२ प्रकल्पग्रस्तांनी आपले केश मुंडण केले. यापुढे हे आंदोलन अतिशय उग्र रुप धारण करणार आहे.या आंदोलनाला मार्गदर्शक म्हणून विलास भोंगाडे, छोटू ठाकरे, प्रवीण इंगोले, मनोज कोसूरकर यांनी मार्गदर्शन केले.
आंदोलन बेदखल केल्याने मुंडण सत्याग्रह
नवीन भूमी संपादनातील योग्य नुकसान भरपाईचा अधिकार आणि स्थानांतर, वाजवी भरपाई व पुनर्वसन, पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१४ नुसार नव्याने भूमी अधिग्रहित करुन सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबांना प्रकल्पग्रस्ताचा लाभ म्हणून शासकीय नोकरीत सामावून घ्यावे आणि जमिनीला योग्य मोबदला द्यावा, या मागणीकरिता चंद्रपूर- वर्धा- यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येऊन एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शासनस्तरावरुन या आंदोलनाची दखल घेतली गेली न गेल्यामुळे सामूहिक मुंडण सत्याग्रह करण्यात आला.