सिंदेवाही शहरासाठी २७ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:19 AM2021-07-04T04:19:45+5:302021-07-04T04:19:45+5:30
विजय वडेट्टीवार : विविध विकासकामांना प्रारंभ सिंदेवाही : सन २०२२ पर्यंत सर्वांच्या घरी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ...
विजय वडेट्टीवार : विविध विकासकामांना प्रारंभ
सिंदेवाही : सन २०२२ पर्यंत सर्वांच्या घरी पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सिंदेवाही शहरासाठी आसोलामेंढातून पाणी आणण्यात येणार आहे. त्यासाठी २७ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नगर पंचायत सिंदेवाहीच्या वतीने आयोजित विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि स्थानिक आमदार निधीमधून नगर पंचायतीकरिता प्राप्त शववाहिनी आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी नगर पंचायत अध्यक्ष अशा गंडाटे, उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, महिला व बालकल्याण सभापती नंदा बोरकर, जि.प. सदस्य रमाकांत लोधे, लोनवाहीच्या सरपंच नेहा समर्थ, पं.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, प्रकाश देवतळे आदी उपस्थित होते.
सुंदर सिंदेवाही करण्याचा आपला मानस असून शहराच्या विकासासाठी कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, येत्या दोन-तीन महिन्यात सिंदेवाहीसाठी ८५ लक्ष रुपयांची अग्निशमन गाडी येणार आहे. नगर पंचायत इमारतीकरिता ३ कोटी तर संरक्षण भिंतीकरिता १ कोटी मंजूर करण्यात आले आहे. शहराच्या सौंदयीकरणात भर देण्यासाठी उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी अडीच कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. सिंदेवाहीतील नागरिकांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहरात विविध ठिकाणी १ कोटी ८४ लक्ष रुपये खर्च करून १६ वॉटर एटीएम लावण्याचे प्रस्तावित आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, सा. बां. विभागाचे अभियंता माधव गावड, आयटीआयचे प्राचार्य प्रमोद चोरे आदी उपस्थित होते.