चंद्रपुरच्या एसबीआय घोटाळ्याची व्याप्ती मोठी; अटकपूर्व जामिनासाठी २७ जणांची न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 12:16 PM2022-03-08T12:16:48+5:302022-03-08T12:41:35+5:30
या प्रकरणात आपलाही आरोपींमध्ये नंबर लागू शकतो, या भीतीपोटी तब्बल २७ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे.
चंद्रपूर : भारतीय स्टेट बँकेतील गृहकर्ज घोटाळा प्रकरण दिवसागणिक नवनवे वळण घेत आहे. पोलिसांना या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात येताच मोठ्या प्रमाणावर धरपकड करण्यात आली. आतापर्यंत २३ जणांना अटक करण्यात आली.
ताज्या घडामोडीनुसार या प्रकरणात आपलाही आरोपींमध्ये नंबर लागू शकतो, या भीतीपोटी तब्बल २७ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या अर्जावर पुढील तीन दिवसात वेगवेगळ्या तारखांना सुनावणी होणार आहे. यामध्ये जामीन मंजूर झाला तर दिलासा आणि नाकारला तर अटकेची टांगती तलवार राहणार आहे.
न्यायालयानेबँकेचे सल्लागार रमण व्यंकटा देगरमुडी व बँकेचे मुंबई येथील नरेंद्र जावळेकर यांचा जामीन अर्ज नाकारला आहे. या दोघांनी पुन्हा जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर येत्या दोन दिवसात सुनावणी होणार आहे. कर्जदार संध्या गायकवाड यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. पी. श्रीखंडे यांनी हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
त्या खात्यात केवळ कमिशनपोटी ३२ लाख
मानधन तत्वावर एसबीआय बँकेत काम करत असलेल्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यात कमिशन स्वरुपात वर्षभरात तब्बल ३२ लाख रुपये जमा झाल्याचे पुढे आल्याची माहिती आहे.
बँक अधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका
पोलिसांनी खोलात जाऊन तपास सुरू केल्यामुळे बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या अधिकाऱ्यांनी शनिवारी गुप्त बैठक घेऊन कार्यवाहीबाबतच चर्चा केल्याची माहिती आहे. यामध्ये अनेकांनी नाराजी व्यक्त करून मोजक्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा सर्वांना त्रास होत असल्याची भावनाही व्यक्त केली.