कत्तलीसाठी नेणाऱ्या २७ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:43 PM2019-02-19T22:43:44+5:302019-02-19T22:44:00+5:30
पोलीस स्टेशन कोठारी हद्दीतील कोठारी - कवडजई या मार्गावर हनुमान मंदिराजवळ एका ट्रकमध्ये (क्र. सीजी ०४ जेए ७६३५) २७ जनावरे भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना देवून ट्रक पकडण्यात आला. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून ट्रक ताब्यात घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
येनबोडी : पोलीस स्टेशन कोठारी हद्दीतील कोठारी - कवडजई या मार्गावर हनुमान मंदिराजवळ एका ट्रकमध्ये (क्र. सीजी ०४ जेए ७६३५) २७ जनावरे भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना देवून ट्रक पकडण्यात आला. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून ट्रक ताब्यात घेतला.
सोमवारी सकाळी ४ वाजताच्या दरम्यान बजरंग दल कार्यकर्ता पराग गावंडे रा. वरोरा यांनी पोलीस स्टेशन कोठारी येथे फोनद्वारे माहिती दिली की कोठारी - कवडजई मार्गावर २७ जनावरे ट्रकमध्ये भरून कत्तलीसाठी घेऊन जाणारा चालक ट्रक सोडून फरार झाला. ही माहिती प्राप्त होताच स्टेशन डायरी अमलदारांनी गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार, सहकारी व पोलीस उपनिरीक्षक सोनवणे कोठारी - कवडजई मार्गाने रवाना झाले. सदर रस्त्यावर हनुमान मंदिरजवळ ट्रक उभा असलेला आढळून आला. चौकशी केली असता ट्रकमध्ये १८ गायी व नऊ बैल असे एकूण २७ जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत २ लाख १६ हजार रूपये व जनावरे भरून असलेला अशोक लेलँड कंपनीचा ट्रक किंमत १० लाख असे एकूण १२ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक गोपी आ. मडावी (४८) रा. सुमठाणा (भद्रावती) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर जनावरे सानगडी येथून ट्रकमध्ये भरली गेली व कत्तलीसाठी पोहचविली जाणार होती. पुढील तपास सुरू आहे.