रस्ते व पूल विकासासाठी २७२ कोटींचा निधी
By admin | Published: May 3, 2016 01:14 AM2016-05-03T01:14:16+5:302016-05-03T01:14:16+5:30
रस्ते अर्थव्यवस्थेतील रक्तवाहिन्या असून रोजगार व अर्थार्जनासाठी रस्त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. त्या
चंद्रपूर : रस्ते अर्थव्यवस्थेतील रक्तवाहिन्या असून रोजगार व अर्थार्जनासाठी रस्त्याचा खूप मोठा फायदा होत असतो. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते उत्तम दर्जाचे करण्यासाठी मुबलक निधी देण्यात येणार आहे. शहराला लागून असलेल्या गावांचा विकास करण्याचा निर्धार केला असून या भागातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून भाजीपाला क्लस्टर तयार करण्यात येणार आहे. यासाठी शिवणी चोर उपसा जलसिंचन योजना व विशेष बाब म्हणून विहिरी मंजूर करण्यात येईल, असे वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
जिल्ह्यातील हडस्ती येथील वर्धा नदीवरील पुलाच्या लोकार्पणप्रसंगी रविवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आ.नाना शामकुळे, आ.संजय धोटे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरशे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ, जि.प. सभापती देवराव भोंगळे, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, मनोज जयस्वाल, शिवणी चोरच्या सरपंच लक्ष्मी कोहचाळे, हडस्तीचे सरपंच बंडू पारखी व कडोलीच्या सरपंच पडवेकर यावेळी उपस्थित होते.
३३ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या या पुलाची लांबी ५८५ मीटर असून उंची १३ मीटर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, सास्ती, कोलगाव, कडोली, हडस्ती, शिवणी चोर या रस्त्यावरील वर्धा नदीवर मोठया पुलासह पोच मार्गाचे बांधकाम करण्यात आले. या पुलाचे लोकार्पण रविवारी ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. सदर पूल तयार झाल्यामुळे राजुरा व गडचांदूर येथील वाहतूक नागपूर व वणीकडे जाण्याकरिता बल्लारपूर व चंद्रपूरवरुन न जाता या वळण मागार्ने जाईल.
कोलगाव, कडोली, निर्ली, चार्ली, धिडसी, पेल्लोरा, पौनी, गोवरी व सातरी येथील लोकांना चंद्रपूरला जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. सदर मार्गाचा चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा या शहरांना वळण मार्ग म्हणूनही उपयोग होईल. सदर वळण मार्गामुळे बल्लारपूर व चंद्रपूर शहरातील वाहतूक वर्दळ कमी होऊन प्रदूषणामध्ये घट होईल व पर्यावरण संतुलन राखता येईल.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चारवट गावाचे आदर्श पुनर्वसन लवकरच केले जाणार असून शिवणी चोर उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन दिवसात बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. माना ते हडस्ती हा रस्ता खनिज विकास निधीमधून तयार करण्यात येणार असून त्यासाठी १४ कोटी ५० लाखांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. या रस्त्याचे कामही लवकरच सुरु होईल, असे ते म्हणाले. त्यासोबतच आरवटच्या पुलाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करावे, यासाठी जुलैच्या बजेटमध्ये निधी देण्यात येईल.
शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत नेण्यासाठी रस्ते चांगले असणे आवश्यक असल्याचे सांगून ना. मुनगंटीवार म्हणाले, भाजीपाला क्लस्टर तयार करण्यासाठी कृषी विभाग व आत्मा यांच्या सहभागाने या भागातील ५ ते १० गावे निवडून येथील तरुणांना प्रशिक्षण देण्याची योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राजुरा-चंद्रपूरला जोडणाऱ्या रस्त्याचे शंभर कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवणी वळण रस्ता सहा कोटी रकमेचे काम ना. मुनगंटीवार यांनी मंजूर केले आहे. भूसंपादनासाठी एक कोटी रक्कम अतिरिक्त मंजूर केली आहे. वरोरा तालुक्यातील वर्धा जिल्ह्याकडे जाणारा माढेळी धानोरा रस्त्यावरील नदीवरील १० कोटी रुपये किंमतीचा पूल मंजूर करण्यात आला आहे. मूल-भेजगाव रस्त्यावरील उमा नदीवरील १० कोटी किंमतीचा पूल जून २०१६ पर्यंत पूर्ण होणार आहे.
मुधोली-घाटकुळ रस्त्यावरील वैनगंगा नदीवरील ७५० मीटर लांबीचा व ५० कोटी रुपये रकमेचा पूल लवकरच सुरु होत आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात उमा नदीवरील पेठगाव राजोली रस्त्यावरील १० कोटी रकमेच्या पुलाचे काम समाविष्ठ करण्यात आले आहे. अशा प्रकारे ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात चंद्रपूर जिल्ह्यात रस्ते व पुलाचे २७२ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून यामधून २०० किलोमिटर रस्ते सुधारणा व १५ पुलाचे बांधकाम होणार असल्याचे डी.के.बालपांडे यांनी प्रास्ताविकातून सांगितले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात दीड वर्षात बांधकाम व रस्त्यासाठी १२०० कोटी रुपये मंजूर झाल्याचे आ. नाना शामकुळे यांनी सांगितले. या पुलामुळे शहराचे अंतर कमी होऊन त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे आमदार संजय धोटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)