२७४ जणांना सापाचा डंख; २७० जणांचा वाचला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 05:00 AM2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:52+5:30

सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात.

274 people were bitten by a snake; 270 lives saved | २७४ जणांना सापाचा डंख; २७० जणांचा वाचला जीव

२७४ जणांना सापाचा डंख; २७० जणांचा वाचला जीव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : साप हा शेतकऱ्याचा मित्र असला तरी गत तीन वर्षांपासून सर्पदंशाच्या घटना वाढू लागल्या. यंदा जानेवारी ते जून २०२१ पर्यंत सर्पदंशाच्या २७४ घटनांची नोंद झाली. वेळीच उपचार झाल्याने २७० जणांचा जीव वाचला, तर चौघांचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातून सर्पदंश प्रतिबंधक लस (स्नेक अँटिव्हेनिन) रुग्णांना मोफत दिले जाते. मात्र, मागणीच्या तुलनेत अल्प पुरवठा व नागरिकांतील गैरसमज आदी कारणांमुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला गमावण्याच्या घटना चिंतेत भर घालणाऱ्या आहेत.
सर्पदंशाच्या बहुतांश घटना ग्रामीण व आदिवासी भागात घडतात, हे वास्तव आहे. सर्पदंशानंतर संबंधित रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी विलंब झाल्यास मृत्यू ओढवण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी केवळ ग्रामीण रुग्णालयच नव्हे, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातही प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. त्यातही डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असले तरच आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचार होऊ शकतात. आरोग्य प्रशासनाच्या अहवालानुसार, जानेवारी ते जून २०२१ पर्यंत जिल्ह्यात विषारी सर्पदंशाच्या २७४ घटना घडल्या, तर उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार झाल्याने १०५ रुग्णांचा जीव वाचला. त्यासाठी सर्पदंशाची घटना घडल्यानंतर गावठी उपचार किंवा मांत्रिकावर विश्वास न ठेवता रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

जूनमध्ये १०६ जणांना सर्पदंश
जून २०२१ मध्ये सर्पदंशाच्या १०६ घटना घडल्या. आठ जणांवर ओपीडी, तर ९७ रुग्णांवर आयपीडीमध्ये उपचार करण्यात आले. यातील सिंदेवाही व गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयांतर्गत दोघांचा मृत्यू झाला. बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चिमूर, कोरपना, मूल, राजुरा, सावली, वरोरा व गडचांदूर रुग्णालयांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना हमखास घडतात.

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तत्काळ रुग्णालयात भरती केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो. सध्या तरी रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक औषधी उपलब्ध आहे. सर्पदंशाच्या रुग्णांच्या उपचाराला कदापि विलंब होऊ देऊ नका, अशा सूचना डॉक्टरर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. सर्पदंश, श्वानदंश व विंचू दंशाच्या घटना व परिणामकारक उपचाराबाबत सातत्याने आढावा घेणे सुरू आहे.
-डॉ. निवृत्ती राठोड, 
जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर

मागणीनुसार अल्प औषधी पुरवठा
राज्यात सर्पदंशावरील औषधी सद्य:स्थितीत फक्त हाफकीन या एकमेव संस्थेत बनविले जाते. मागणीच्या तुलनेत औषधीचा कमी पुरवठा होतो. एकूण मागणीच्या तुलनेत १० ते १५ टक्के औषधी उपलब्ध होत असल्याने अडचणी वाढतात. 

गैरसमज व अंधश्रद्धा धोकादायकच 
सापाचे विष मंत्राने उतरते. कडुलिंबाचा पाला व मिरची खाल्ल्यास प्रकृती सुधारते, सर्पदंश झालेल्या जागेवर औषधी वनस्पती उगाळणे किंवा बिया वगैरे खायला देणे, सर्पदंशाच्या ठिकाणी गरम केलेल्या लोखंडाने डागण्या देणे, यासारखे अनेक गैरसमज-अंधश्रद्धा शहरी व ग्रामीण भागात आजही आहेत. हे सर्व उपाय निरर्थक व वेळ वाया घालविणारे आहेत. असे केल्यास व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होतो.
 

 

Web Title: 274 people were bitten by a snake; 270 lives saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.