राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २७५ प्रकरणांचा निपटारा
By admin | Published: April 13, 2017 12:53 AM2017-04-13T00:53:27+5:302017-04-13T00:53:27+5:30
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारला राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : १ कोटी ३६ लाखांवर यशस्वी तडजोड
चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारला राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयात एकाच दिवशी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्यापूर्वीची (प्रिलिटिगेशन) प्रकरणे ठेवण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतीस पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, २७५ प्रकरणांचा निपटारा होऊन एकाच दिवशी १ कोटी ३६ लाख रुपयांच्यावर यशस्वी तडजोड करण्यात आली.
यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नितीन बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात १० पॅनलची नेमणूक करण्यात आली होती. याप्रसंगी न्या. नितीन बोरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी.एस. इंगळे यांनी जिल्हा न्यायालयातील पॅनलला भेटी देऊन पॅनलची पाहणी केली. या लोकअदालतीला विविध बँकेच्या, विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दोघांमध्ये असलेला वाद आपसी समझोत्याने निकाली काढण्याकरिता आपसात चर्चा केली. परिणामी, या लोकअदालतमध्ये जिल्ह्यातून २७५ प्रकरणे निकाली निघून विविध प्रकरणांमध्ये १ कोटी ३६ लाख ५९ हजार ११३ रुपयांचे वाद आपसी समझोत्याने सोडविण्यात आले.
प्रकरणांचा निपटारा करण्याकरिता अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.आर. नाईकवाडे, के.एल. व्यास, न्या.सी.आर. बलवानी, व्ही.एम. कऱ्हाडकर, आर.एम. राठोड, आर.एन. मेहरे, एस.झेड. खान, ए.एल. सराफ, डी.व्ही. हरणे, टी.जी. बन्सोड यांची प्रमुख पॅनल जज म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना साहाय्यक म्हणून पॅनल अधिवक्ता व सामाजिक कार्यकर्ता प्रा. सुरेश लोहे आदींनी यशस्वी कामगिरी पार पाडली. यावेळी न्यायाधीश विश्वास खोत, पक्षकार, बँकांचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (नगर प्रतिनिधी)
मोटार अपघातातील महत्त्वपूर्ण समझोत्याचा निर्णय
लोकअदालतीमध्ये मोटार अपघात संबंधातील दोन प्रकरणांमध्ये झालेला समझोता महत्वपूर्ण ठरला. या दोन प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकारांनी एकत्रितरित्या ६७ लाख रुपये नुकसान भरपाईबाबत तडजोड मान्य केली व प्रतिवादींनी अर्जदारांना ६७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. यावेळी संबंधित पक्षकारांच्या चेहऱ्यावर एकाच दिवसात प्रकरणांमध्ये तडजोड झाल्याचे समाधान होते. या प्रकरणामध्ये अॅड. जोगी व अॅड. अभय कुल्लरवार यांनी काम पाहिले. तसेच पॅनल प्रमुख म्हणून न्यायाधीश के.एल. व्यास यांनी काम पाहिले.