अवकाळी पावसामुळे २८०० हेक्टरचे नुकसान
By admin | Published: March 11, 2017 12:43 AM2017-03-11T00:43:08+5:302017-03-11T00:43:08+5:30
जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, पोंभुर्णा, चिमूर आदी तालुक्यांमध्ये मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
रबीमध्ये पीक विम्याकडे पाठ : बल्लारपूर व राजुऱ्यात ५१ गावे बाधित
चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, पोंभुर्णा, चिमूर आदी तालुक्यांमध्ये मंगळवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्राथमिक अंदाजानुसार २ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यातील रामपूर येथील एका शेत तलावातील शेकडो मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार बल्लारपूर आणि राजुरा या दोन तालुक्यातील ५१ गावांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रबी हंगामाध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरविली आहे. परिणामी अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता नसून त्यांना केवळ शासकीय मदतीवर अवलंबून राहावे लागणार आहे.
वादळी पावसाने गारांसह हजेरी लावल्याने बल्लारपूर तालुक्यात अनेक झाडे उन्मळून पडली आणि विद्युत तारा तुटल्या. पहिल्या वादळी व गारपीटीच्या तीव्र पावसानंतर परत एक तासाने गारांसह पाऊस बरसला. या वादळी पावसामुळे वीज खंडीत झाली. अवकाळी पावसामुळे तालुक्यात गहू, हरभरा, मिरची, कापूस व भाजीपाल्याचे नुकसान झाले. बल्लारपूर, विसापूर, भिवकुंड, काटवली, कोठारी, पळसगाव, कवडजई, बामणी, मानोली, इटोली, आमडी, कळमना, परसोडी, कुडेसावली आदी गावांमध्ये नुकसान झाले आहे. राजुरा तालुक्यातील नदीपट्यातील मानोली, बाबापूर, कालगाव, कढोली परिसराला पाऊस व गारपिटीचा फटका बसला.
याशिवाय चंद्रपूर आणि चिमूर तालुक्यातील अनेक गावातही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. राजुरा तालुक्यातील सास्ती येथून दोन किलोमीटर अंतरावर रामनगर येथे गारपिटीमुळे शेततळ्याचे पाणी थंडगार झाले. मासोळ्यात ते तापमान सहन करू न शकल्याने मरण पावल्या. गेल्या ३-४ वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी रबी हंगामामध्ये राष्ट्रीय पीक विमा योजनेत पिकांचा विमा काढलेला नाही.
गेल्या वर्षीच्या हंगामात नागपूर विभागाला २२ लाखांची नुकसान भरपाई मिळाली असताना चंद्रपूर जिल्ह्यात विमा काढला नसल्याने कोणालाही लाभ मिळाला नाही. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी त्याचा विमा नसल्याने त्याची नुकसान भरपाई मिळणार नाही. (प्रतिनिधी)
सर्वेक्षण अडकणार सुट्यांमध्ये
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, कृषी विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहेत. दोन दिवसांपासून सर्वेक्षण सुरू आहे. परंतु महिन्याचा दुसरा शनिवार, त्यानंतर रविवार आणि सोमवारी रंगपंचमीची शासकीय सुटी आली आहे. परिणामी सर्वेक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासकीय सुट्या असल्या तरीे सर्वेक्षणासाठी शेतकरी बाधित पीक शेतात तसेच ठेवणार नाहीत. पंचनामा करताना ते पीक दिसले नाही तर त्याची गणना नुकसानीमध्ये होणार नाही.
दोन व्यक्ती जखमी, दोन जनावरे दगावली
महसूल विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, अवकाळी पावसादरम्यान चिमूर तालुक्यात वीज पडून ज्ञानबा निळकंठ अलोणे आणि त्यांचा मुलगा घनशाम ज्ञानबा अलोणे जखमी झाले आहेत. तसेच बल्लारपूर तालुक्यात दोन जनावरे मरण पावली आहेत. पोंभुर्णा तालुक्यात दोन घरे बाधित झाली आहेत. कृषी विभागाने शासनाला २ हजार ८७४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कळविला आहे. बल्लारपूर तालुक्यात नुकसान झालेले ७०० हेक्टर क्षेत्र आहे.
आज कृषिभवनाचे उद्घाटन
वरोरा नाका येथे नवीन कृषिभवनाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ११ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर राहणार आहेत. यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित राहणार आहेत.