२८३ ब्रास अवैद्य रेतीसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:27 AM2020-12-29T04:27:57+5:302020-12-29T04:27:57+5:30
फोटो वढोली : गोंडपिपरीचे तहसीलदार यांनी अंधारी नदी घाटावर धाड टाकून पात्रातून काठावर जमा केलेला तब्बल २८३ ब्रास ...
फोटो
वढोली : गोंडपिपरीचे तहसीलदार यांनी अंधारी नदी घाटावर धाड टाकून पात्रातून काठावर जमा केलेला तब्बल २८३ ब्रास रेतीचा साठा जप्त केला. ही कार्यवाही महसूल विभागाच्या भरारी पथकासह स्वत: तहसीलदार के.डी.मेश्राम यांनी रविवारी सायंकाळी केली. अलिकडे तालुक्यात रेती व्यवसायाविरुद्ध प्रशासनाकडून सुरू असलेल्या धडाकेबाज कार्यवाहीमुळे तस्कर प्रचंड धास्तावले आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान अंधारी नदीवरील लिखितवाडा टेकोडा घाटावर धाड टाकली. नदीपात्रातून अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून शेतात हा साठा गोळा करण्यात आला होता. यात अंदाजे २८३ ब्रास रेती होती. सदर साठा जप्त करून महसूल पथक एवढयावरच थांबले नाही तर त्यांनी नदी पात्रात चौकशी केली. यावेळी तहसीलदारांना अगदी काठावर अंदाजे २३ ब्रास रेती दिसून आली. हादेखील साठा त्यांनी जप्त केला. हा रेतीसाठा तहसीलदार मेश्राम यांनी लिखितवाडा येथील पोलीस पाटील यांच्या सुपूर्द केला.
मागील तीन दिवसांपासून सतत सुट्या आल्या. शिवाय महसूल विभाग ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. याची संधी साधून रेती तस्करांनी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करणे सुरू केले होते. शेवटी महसूल प्रशासनाने आज शेकडो ब्रास रेतीचा साठा शेवटी हस्तगत केलाच. ही कार्यवाही स्वत: तहसीलदार के.डी. मेश्राम यांनी केली असून महसूलच्या भरारी पथकात तलाठी जे.टी. बलके, सुरज राठोड, ओमकार भदाडे यांचा समावेश होता.