जिल्हा सामान्य रूग्णालयात १३ कोटींची एमआरआय मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:38 AM2019-08-14T00:38:33+5:302019-08-14T00:39:50+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती झाल्यापासून एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. शिवाय, जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रूग्णांना मशीनअभावी अन्यत्र पाठवावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती झाल्यापासून एमआरआय मशीन उपलब्ध नसल्याने वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. शिवाय, जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या शेकडो रूग्णांना मशीनअभावी अन्यत्र पाठवावे लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व जिल्हा खनिज प्रतिष्ठानने तब्बल १३ कोटी २० लाखांचा निधी मंजूर केला. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने मंगळवारी या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. त्यामुळे एमआरआय मशीन खरेदीची प्रक्रिया लवकरच सुरू आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि रूग्णांच्या अत्याधुनिक उपचाराकरिता एमआरआय मशीनची अत्यंत आवश्यकता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित केलेली ही मशीन अतिशय महागडी आहे. चंद्रपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती झाल्याने आरोग्य सेवेचा विस्तार झाला. परंतु, या महाविद्यालयात एमआरआय मशीनचा अभाव आहे. ही यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी राज्य शासनाला कोट्यवधी रूपयांची आवश्यकता होती. याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने १ डिसेंबर २०१६ पासून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनीही एमआरआय मशीनची आवश्यकता मान्य केली. मात्र, कोट्यवधी रूपयांची तरतूद कुठून करावी, यावरून हा प्रश्न मार्गी लागला नव्हता. दरम्यान, राज्यातील प्रसिद्ध तिर्थस्थळ शिर्डी येथील श्री साई बाबा संस्थान विश्वस्त संस्थेने सामाजिक दायित्च म्हणून निधी देण्याचे मान्य केले. एमआरआय यंत्र सामुग्री अत्यंत महागडी असल्याने १० कोटींपेक्षा अधिक रक्कमेची गरज होती. चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध अभ्यास शाखेतील विद्यार्थी आणि हजारो रूग्णांच्या आरोग्यासाठी या मशिनशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात घेऊन जिल्हा खनिज प्रतिष्ठाननेही निधीची तरतूद केली. परिणामी, जिल्हा खनिज प्रतिष्ठान व शिर्डी संस्थेच्या वतीने तब्बल १३ कोटी २० लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला. राज्य शासनाने मंगळवारी या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामुळे यंत्रसामुग्री खरेदीची प्रक्रिया सुरू करून निविदा काढण्यात येणार आहे.
सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात टेस्ला एमआरआय मशीन ही यंत्र सामुग्री उपलब्ध व्हावी, यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष दिले होते. ही महागडी यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी १२ ते १३ कोटी रूपयांचा निधी लागत असल्याने जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून उपलब्ध करून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थेलाही जिल्ह्यातील आरोग्यसेवेचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थी व रूग्णांची समस्या कायमची दूर होणार आहे.
यंत्र खरेदी समितीचे अनुपालन होणार
१३ कोटी २० लाखांची एमआरआय मशीन खरेदी करण्यासाठी उद्योग, उर्जा, कामगार विभागाच्या राज्यस्तरीय खरेदी समितीने नियम तयार केले आहेत. या नियमांचे अनुपालन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय प्रशासनाला करावा लागणार आहे. अन्यथा, खरेदी संदर्भातील प्रशासकीय मान्यतेला विलंब होऊ शकतो. आरोग्य प्रशासनाने ही कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे