ब्रह्मपुरीत काँग्रेस नगरसेवकाच्या घरून ३ लाख ३४ हजारांचा दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:51 AM2021-03-13T04:51:25+5:302021-03-13T04:51:25+5:30
या प्रकरणी घरमालक महेश भर्रे यांच्यासह मद्यसाठा पुरवठा करणारे नानु नाकतोडे, नकुल शिलोकर, दुर्गेश बसाखेत्री व प्रदीप चंद्रभान भर्रे ...
या प्रकरणी घरमालक महेश भर्रे यांच्यासह मद्यसाठा पुरवठा करणारे नानु नाकतोडे, नकुल शिलोकर, दुर्गेश बसाखेत्री व प्रदीप चंद्रभान भर्रे या पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम १९४९ कलम ६५ (अे)(ई), ८१, ८३, व १०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींनी फरारी घोषित केले आहे.
महेश भर्रे यांच्या घरात भारतीय बनावटीची विदेशी व देशी मद्याचा साठा लपवून ठेवला आहे. मद्यसाठ्याची वाहतुक करण्याकरिता एचएच ०१ एएल २१५३ या क्रमांकाच्या स्कार्पिओचा वापर करीत असल्याची माहिती गुप्तहेरामार्फत मुबंई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याचे समजते. या आधारे कार्यालयीन स्टाफ, दोन पंचांना सोबत घेऊन महेश भर्रे यांच्या घरावर धाड घातली. घरासमोर उभ्या असलेल्या स्कार्पिओची झडती घेतली. वाहनात देशी मद्याचे १८० मिली व ९० मिलीचे विविध ब्रॅण्डचे ७२ बाॅक्स आढळून आले. यानंतर घराची झडती घेतली. घरात कोणीही व्यक्ती नव्हती. मात्र घरातही दारूसाठा आढळून आला. घरातून विदेशी व देशी मद्याचे १८० मिलीचे विविध ब्रॅण्डचे २३ बाॅक्स आढळून आले. असा एकूण ११ लाख ३४ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. अधिक तपास राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई येथील भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुहास झांझुर्णे करीत आहेत. ही कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कच्या गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर येथील स्टाफचे सहकार्य घेण्यात आल्याचे समजते.
कारवाईला राजकीय रंग
महेश भर्रे हे काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्यांच्या घरी धाड घालण्यासाठी मुंबईहून राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक आले. ही कारवाई विदर्तील पथकामार्फतही करता आली असती. मात्र मुंबईहून पथक आल्याने या मागे राजकीय डावपेच असल्याचा सूर ब्रह्मपुरीत उमटत आहे.
खोट्या कारवाईत गोवण्याचा विरोधकांचा डाव - महेश भर्रे
राजकीय विरोधकांकडून घरी नसल्याची संधी साधून ही कारवाई केली आहे. ज्या वाहनातून दारूसाठा जप्त केला त्या वाहनाशी आपला काहीही संबंध नाही. घरातून १५ ते १८ पेट्या दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई वस्तुस्थितीला धरून नाही. घरातून वा घरातील व्यक्तीच्या ताब्यातून कोणत्याही प्रकारची मद्यसामुग्री मिळालेली नाही. राजकीय षडयंत्रापोटी व बदनामी करण्यासाठी या कारवाईत आमचे आमचा संबंध जोडण्याचा प्रकार केला असल्याचे महेश भर्रे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.