२९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म, थेट २०२८ मध्ये पहिला वाढदिवस!
By परिमल डोहणे | Published: March 2, 2024 06:55 PM2024-03-02T18:55:00+5:302024-03-02T18:56:12+5:30
लिप वर्षात बाळाचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला की, आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा आनंद होतो.
चंद्रपूर: लिप वर्षात बाळाचा जन्म २९ फेब्रुवारीला झाला की, आई-वडिलांसह सर्वांनाच मोठा आनंद होतो. कारण २९ फेब्रुवारी ही चार वर्षांतून एकदाच येत असते. यंदाच्या लिप वर्षात जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा तर उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० बाळांचा जन्म झाला आहे. यात १८ मुले व आठ मुलींचा समावेश आहे. या सर्वांनाच आता वाढदिवस साजरा करण्यासाठी २०२८ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वर्षातील फेब्रुवारी महिन्याव्यतिरिक्त इतर महिने ३० किंवा ३१ दिवसांचे असतात. तर फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असतो. यंदाचे २०२४ हे लिप वर्ष आहे. त्यामुळे यंदाचा फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होता. चार वर्षांतून एकदाच असा दिवस येत असतो. त्यामुळे २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या कुटुंबांचा आनंद द्विगुणित होत असतो. जिल्ह्यात २९ फेब्रुवारीला ३० बाळांचा जन्म झाला आहे. यांना आता थेट २९ फेब्रुवारी २०२८ मध्ये वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळणार आहे. बरेचदा २९ फेब्रुवारीला जन्मलेले काही जण वर्षांची प्रतीक्षा न करता त्यांचा वाढदिवस २८ फेब्रुवारी किंवा १ मार्चला साजरा करतात.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दहा बालकांचा जन्म
चंद्रपूर शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात २९ फेब्रुवारी २०२४ रोजी १० बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये सहा मुले व चार मुलींचा समावेश आहे. लिप वर्षाला जन्म झाल्यामुळे सर्वच आई-वडिलांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
ग्रामीण रुग्णालयात २० बालकांचा जन्म
चंद्रपूर जिल्ह्यात चार उपजिल्हा रुग्णालय, दहा ग्रामीण रुग्णालय, ५८ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ३३९ उपकेंद्र आहेत. यामध्ये २९ फेब्रुवारी २०२४ ला २० बालकांचा जन्म झाला आहे.