कंत्राटदाराला ३० लाखांचा दंड
By admin | Published: June 6, 2017 12:38 AM2017-06-06T00:38:58+5:302017-06-06T00:38:58+5:30
गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही.
गडचांदूर येथील योजना : चार वर्षांपासून जलशुद्धीकरणाचे काम रेंगाळले
लोकमत न्यूज नेटवर्क
वनसडी : गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवानी लागत आहे. याची दखल घेत चार वर्षे लोटूनही काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारावर ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
गडचांदूर शहराला सिमेंटनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत होती. याची दखल घेत येथे फिल्टर प्लांट आणि पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडे हे काम सोपविण्यात आले. जीव प्राधिकरणाने निविदा प्रकाशित केली. कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे काम सोपविण्यात आले.
मागील चार वर्षापासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र काम संथगतीने सुरू आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची हमी कंत्राटदाराने दिली होती. मात्र, मुदतीत काम झाले नाही. त्यामुळेच आता कंत्राटदारावर दररोज चार हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत ३० लाखांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आल्याचे जीवन प्राधीकरण विभागाकडून सांगण्यात आले.
या कामाबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दोन महिन्यातच काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षीही हेच उत्तर त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले होते. वास्तविक, फिल्टर प्लांट, टाकी आणि पाइप फिटींगची अनेक कामे व्हायची आहेत. शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती.