मनपातर्फे ३० हजार वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2017 12:28 AM2017-06-10T00:28:47+5:302017-06-10T00:28:47+5:30
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्रात १ जुलै २०१७ रोजी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्रात १ जुलै २०१७ रोजी ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेने ३० हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
चंद्रपूर महापालिकेलो २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या वृक्ष लागवडीच्या नियोजनाकरिता महापौर अंजली घोटेकर यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीमध्ये मनपा क्षेत्रात ठिकठिकाणी लावण्यात येणाऱ्या वृक्षारोपणाबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत चंद्रपूर कार्यक्षेत्रात झाडे लावण्यासंदर्भात आतापर्यंत किती खड्डे खोदण्यात आले. तसेच मागील वर्षात लावण्यात आलेल्या झाडापैकी जी झाडे मृत झालेली आहे, त्या ठिकाणी नविन झाडे लावण्यात यावी. शहरातील शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संघटना, हॉटेल, दवाखाने, एम.ई.एल., डब्ल्यू.सी.एल., आय.एम.ए. आदी संस्थेचे सहकार्य घेऊन वृक्ष लागवड करण्यात यावे. प्रति बँकेमार्फत जास्तीत जास्त ट्रि-गार्ड घेऊन सहकार्य घेण्यात यावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले. मंदिर परिसरात ओपनस्पेसमध्येसुद्धा जास्तीत जास्त वृक्ष लावण्यात येणार आहे. २५ हजार वृक्षांचे उद्दिष्ट असले तरी मनपाने त्यापेक्षा अधिक वृक्ष लागवड करावी, असे महापौर अंजली घोटेकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. डंपींग यार्डमध्ये सर्वात जास्त म्हणजे पाच हजार झाडे लावण्यात यावी. यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंग यांचा समावेश करावा. ही झाडे २४ तास आॅक्सीजन देतात. तसेच कंपोष्ट डेपोच्या दर्शनी भागावर सत्पपर्णीची मोठी झाडे लावावी. एक सुंदर बगीचा एका कोपऱ्यात तयार करावा. त्यात बसण्याकरिता बेचेंसची व्यवस्था करावी. कंपोस्ट डेपोमधील कचरा विटाभट्टीमुळे झालेल्या खड्डयात भरावा. जेणेकरून समतोल होईल व कचऱ्याचे डोंगरे दिसणार नाही, अशा सूचना महापौरांनी यावेळी दिल्या. कंपोष्ट डेपोच्या बाहेरील बल्लारपूर रोडच्या दोन्ही बाजुची घाण व प्लॅस्टीकच्या पिशव्या, गिफ्टचे प्लॅस्टीक या सर्वांची स्वच्छता करावी व दुतर्फा चांगली झाडे लावावी. सर्व कर्मचाऱ्यांनीसुद्धा किमान दोन झाडे स्वखर्चाने घरासमोर लावावी व ट्री-गार्ड लावावे. सर्व मनपा शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना झाडे द्यावी, असेही महापौरांनी सांगितले.
शहरातील सर्व मोठे खासगी हॉस्पीटल, सर्व मोठे हॉटेल्स, सर्व मॉल, सर्व लॉन, सर्व बिल्डर्स यांनासुद्धा लवकरच बैठकीसाठी बोलावून वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सर्वाना योगदान देण्याची विनंती करण्यात येणार आहे. चंद्रपूरकरांनीही या ऐतिहासिक वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दर्शवावा, असे आवाहन मनपा महापौर अंजली घोटेकर यांनी केले आहे.
यावेळी आयुक्त संजय काकडे यांनीही वृक्षरोपणासंदर्भातील नियोजनाची माहिती दिली.