वाचन न करताच ३० विषय मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:45 PM2017-12-22T23:45:23+5:302017-12-22T23:46:55+5:30
सर्वसाधारण सभेत चालवायच्या विषयांची अंतिम सूची सभागृहात वाचन करून त्या त्या विषयाला मंजुरी दिली जाते.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : सर्वसाधारण सभेत चालवायच्या विषयांची अंतिम सूची सभागृहात वाचन करून त्या त्या विषयाला मंजुरी दिली जाते. मात्र शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केवळ दोन विषयांचे वाचन करून ३० विषय वाचनाविनाच मंजूर करण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, कमी पटसंख्येमुळे बंद करण्यात आलेल्या ४५ शाळांमधील विद्यार्थी कुठे जाणार, पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, त्यांना गावातच शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात व सभागृहाबाहेर निदर्शने करून शासनाचा निषेध केला.
सभेला सुरूवात झाली तेव्हा विषय सुचीवर ३० विषय होते. या विषयांवर सभागृहात चर्चा करून त्या विषयांना मंजुरी दिली जाते. मात्र विषय क्रमांक १ व २ चे वाचन करून अध्यक्षांनी स्वत:च विषयाला मंजूरी असल्याचे सभागृहात सांगितले. त्यामुळे काँग्रसचे गटनेता डॉ. सतीश वारजुकर यांनी अध्यक्ष कोणतीही चर्चा न करता विषय सुचीवरील विषय मंजुर करत असल्याचे पाहून रागात सर्वच विषय मंजूर करा, असे सुचविले. त्यामुळे अध्यक्षांनीही इतर विषयांचे वाचन थांबवून सर्वच विषय मंजूर असे सभागृहात सांगितले. मात्र यावर सभागृहातल्या एकाही सदस्याने आक्षेप घेतला नाही. विषय सुचीवर महत्त्वाचे विषय असतानाही एकाही सदस्याने विरोध न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी शासनाकडून सव्वा चार कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तर ‘मी सभापती बोलतोय’ या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील सरपंचांना थेट सभापतींशी संवाद साधून समस्या मांडता येत असल्याने जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे व समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला मंजूरी देण्यात आली. मात्र याचवेळी २५/१५ चा २५ कोटींचा निधी व मूल पंचायत समिती इमारत बांधकामासाठी मिळालेला ८ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते केल्याने याबाबतही अभिनंदन ठराव मंजूर करण्याची मागणी वारजूकर यांनी केली. मात्र सभागृहाने ही मागणी फेटाळून लावली. वसंत भवनात गेल्या कित्येक वर्षांपासून बस्तान मांडून असलेल्या व्यवसायिकांवर कार्यवाही करण्यात जिल्हा परिषद दिरंगाई करीत असल्याचा विषयही सभेत चांगलाच वादळी ठरला. मात्र या विषयावर कोणताही ठोस निर्णय होवू शकला नाही. नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना जिल्हा परिषदेने मदत करण्याची मागणी आसावरी देवतळे यांनी केली. संजय गजपुरे यांनी वसंत भवन, मामा तलावातील अतिक्रमण व जिल्ह्यातील सरपंच व सदस्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न उपस्थित केला.
विरोधकांच्या प्रश्नांना बगल
सभागृहात काँग्रेसचे गटनेता सतीश वारजूकर यांनी १६ तर सत्ताधारी गटाचे संजय गजपुरे यांनी तीन विषय मांडले. गजपुरे यांच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र आपले विषय महत्त्वाचे असतानाही अध्यक्षांनी बगल देत चर्चा होवू दिली नाही, असा आरोप गटनेता वारजूकर यांनी केला आहे. ग्रामीण भागातील महत्त्वाच्या समस्यांवर सभागृहात चर्चा होत नाही. आणि झालीच तर केवळ मोघम उत्तरे दिली जातात, असे वारजूकर यांनी म्हटले आहे.
विषय सुचीवरील सर्व विषयांवर चर्चा झाली. विरोधकांनी होकार दिल्यानंतरच विषयांना मंजुरी देण्यात आली. कुणाच्याही प्रश्नांना बगल दिली नाही.
- देवराव भोंगळे, जि. प. अध्यक्ष, चंद्रपृूर.