दर्जेदार शिक्षणासाठी ३०० शाळांचे रूपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2022 05:00 AM2022-05-04T05:00:00+5:302022-05-04T05:00:11+5:30
ज्यावेळी जि. प. ला चांगले अधिकारी मिळाले तेव्हाच प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा करण्यासाठी शाळांचे डिजिटलायझेशन करू. प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावेत. विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे एकाच वेळी ३०० शाळांत ऑनलाइन पद्धतीने शिकविता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा एक तास अभ्यास व्हावा, असे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शिक्षण हे आपले ‘ॲसेट’ असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येक तालुक्यातील २० याप्रमाणे ३०० शाळा अत्याधुनिक करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला तीन कोटींचा निधी देऊ, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर जि. प. हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृहातील कार्यक्रमात ते बोलत होते.
मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, प्रकाश देवतळे उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जि. प. स्थापनेचे हे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. जि. प. ही ग्रामीण भागातील विकासाचा कणा मानली जाते. ज्यावेळी जि. प. ला चांगले अधिकारी मिळाले तेव्हाच प्रगतीचा आलेख उंचावला आहे. शिक्षणाबाबत एक मॉडेल जिल्हा करण्यासाठी शाळांचे डिजिटलायझेशन करू. प्रत्येक विषयाचे चांगले शिक्षक नेमावेत. विषयतज्ज्ञ शिक्षकांद्वारे एकाच वेळी ३०० शाळांत ऑनलाइन पद्धतीने शिकविता आले पाहिजे. स्पर्धा परीक्षा, नीट, जेईई आदी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा एक तास अभ्यास व्हावा, असे नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केल्या. आरोग्य सुविधा, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे दर्जेदार असावीत. जि. प. प्रशासकीय इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी प्रास्ताविक, तर सावन चालखुरे यांनी संचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी आभार मानले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विभाग प्रमुखांचे दोनदा प्रशिक्षण घ्यावे
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, २९ पैकी केवळ १४ विषय जि. प.कडे आहेत. सर्व विभाग प्रमुखांचे वर्षातून दोनदा प्रशिक्षण घ्यावे. प्रभारी जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जि. प. हीरक महोत्सव ही आनंदाची घटना आहे, ६० वर्षांत जिल्ह्याचा बराच विकास झाला, असे सांगितले.