३१५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:26 AM2021-03-21T04:26:32+5:302021-03-21T04:26:32+5:30

घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यात ३१५ शेतकरी कृषी विहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीच्या निविदा न निघाल्यामुळे ...

315 farmers waiting for electricity connection | ३१५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

३१५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

googlenewsNext

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यात ३१५ शेतकरी कृषी विहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीच्या निविदा न निघाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याची माहिती आहे.

नागभीड तालुक्यात सिंचनाची कोणतीही सोय नाही. येथील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यातील शेतकरी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विहिरींच्या विविध योजनांचा लाभ घेत असून, या विहिरींच्या माध्यमातून शेतीला ओलीत करीत आहेत. २००० ते मार्च २०१८ पर्यंत या तालुक्यातील जवळपास २ हजार २०३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

मात्र, मार्च, २०१८ नंतर विद्युत मंडळाने वीज जोडण्या देण्याबाबत हात आखडते घेतले आहे. त्याऐवजी सौरऊर्जा संच देण्याकडे शासनाचा कल होता. मात्र, सौरऊर्जा संचास म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे परत वीज जोडणी देणे सुरू करण्यात आले. विश्वसनीय माहितीनुसार, जवाहर विहीर योजना, जीवनधारा विहीर योजना, महाराष्ट्र ग्रामीण विहीर योजना, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना या योजनांमधील विहिरीच्या ३९१ शेतकऱ्यांनी विहिरीचे काम पूर्ण करून विद्युत मंडळाकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले होते, अशी माहिती आहे. या ३९१ लाभार्थ्यांपैकी चालू वर्षात केवळ ७६ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली. उर्वरित निविदा निघाल्यानंतरच जोडणी मिळणार असल्याचे संकेत आहेत. आता या निविदा केव्हा निघतात, याकडे या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणाला आणि नापिकीला कंटाळून या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये. या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी मिळाली, तर ते आपल्या उत्पादनात निश्चितच भर घालू शकतात.

Web Title: 315 farmers waiting for electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.