वीज पडून ३२ शेळ्यांचा मृत्यू, पाच जखमी; गुराखीही गंभीररित्या जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2022 11:10 AM2022-04-23T11:10:19+5:302022-04-23T11:15:10+5:30
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राजुरा तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. सोंडो शिवारात गारपिटीसह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी परिसरात शेळ्यांचा कळप चरत होता.
देवाडा (चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोंडो गावाच्या काही अंतरावर असलेल्या शेतशिवारात अचानक वीज कोसळल्याने तिथे चरत असलेल्या तब्बल ३२ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच शेळ्या जखमी झाल्या. यात गुराखीही गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राजुरा तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. सोंडो शिवारात गारपिटीसह विजांचा कडकडाट सुरू झाला. याच परिसरात शेळ्यांचा कळप चरत होता. अचानक या कळपावरच वीज कोसळली आणि ३२ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच शेळ्या जखमी झाल्या. विशेष म्हणजे, तिथेच शेळ्यांचा मालक वासुदेव पोचना जिठापेनावार (५९, रा. सोंडो) हादेखील उभा होता. तोदेखील गंभीररित्या जखमी झाला. त्याला तत्काळ राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती आमदार सुभाष धोटे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. राजुरा तहसीलदार हरिश गाडे, मंडल अधिकारी सुभाष साळवे, तलाठी रमेश मेश्राम, पशुवैद्यकीय अधिकारी प्रमोद जल्लावार, पोलीस पाटील करमनकर यांनीही घटनास्थळी भेट दिली. या दुर्घटनेत वासुदेव यांचे अंदाजे चार लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.