३४ पैकी ३२ पाणवठे कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:47 PM2018-05-04T23:47:40+5:302018-05-04T23:48:03+5:30
जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधीत राहावे व त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली.
राजू गेडाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : जंगलातील वन्यप्राण्यांचे क्षेत्र अबाधीत राहावे व त्यांना मुक्तपणे भ्रमण करता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केली. यात मूल वनपरिक्षेत्रातील ९६.७० चौ. किमी. क्षेत्र जंगल राखीव ठेवण्यात आले. यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांना पाणी मिळावे, यासाठी ३४ पाणवठे निर्माण करण्यात आले. मात्र गतवर्षी कमी पाऊस पडल्याने ३४ पैकी केवळ दोनच पाणवठ्यात सध्यास्थितीत पाणी आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असून गावाकडे धाव घेत आहे. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शासनाच्या २२ आॅगस्ट २०१२ च्या परिपत्रकानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची पुनर्रचना करण्यात आली. विभागीय वनाअधिकारी चंद्रपूर वनविभागाअंतर्गत पाच परिक्षेत्र निर्माण करण्यात आले. यात चंद्रपूर, चिचपल्ली, वरोरा, भद्रावती, सावली तर बफर मध्ये सहा परिक्षेत्राची निर्मिती करण्यात आली. यात चंद्रपूर (बफर), शिवणी, पळसगाव, मूल, मोहुर्ली, खडसंगीचा समावेश करण्यात आला. मूल वनपरिक्षेत्र ९६.७० चौ. कि.मी. क्षेत्रात असून या परिक्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वनविभाग वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी संवेदनशिल आहे.
जंगलात वन्यप्राण्यांना मुक्तपणे संचार करता यावा व पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध रहावा यासाठी नैसर्गिक व स्वनिर्मीत पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली. यात मारोडा येथे पाच, भादुर्णी ११, फुलसटी- ५, जानाळा- ३, डोनी ५, कारवन ३ व करवन येथे दोन पाणवठे निर्माण करण्यात आले. मात्र सध्यास्थिती केवळ दोनच पाणवठ्यात पाणी उपलब्ध आहे. फुलसरी व डोनी या दोन क्षेत्रात सौरपंप बसविण्यात आल्याने दिवसभर सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी पाणवठ्यात जमा होत असते.
फुलझरी व डोनी या जंगलव्याप्त क्षेत्रात विद्युत व्यवस्था नसल्याने सौरपंप पाणवठ्यासाठी वरदान ठरु पाहत आहे. मात्र इतर पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन वर्षापूर्वी पाणवठ्यात टँकरने कृत्रिम पद्धतीने पाणी पुरविल्या जात होते. यावर्षी पाणी टंचाईच्या काळात मात्र वनविभागाचे अधिकारी व प्राणी मित्र यांचे समन्वयक नसल्याने पाणवठे कोरडे पडले आहेत.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मूल परिक्षेत्रातील डोनी व फुलझरी येथील दोनच पाणवठ्यात सौरपंपामुळे पाणी उपलब्ध आहे. याचबरोबर सोमनाथ, भादुर्णी, मारोडा, येथील नैसर्गिक तलावात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या परिसरातील वन्यप्राण्यांची सध्यातरी पाण्यासाठी भटकंती होणार नाही.
- एस.जे. बोबडे, वनपरिक्षेत्र अधिकारी (बफर) मूल
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रात उन्हाळ्याच्या दिवसात आटलेल्या पाणवठ्यात टँकरने पाणी पुरविले जात होते. मात्र वनविभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने सध्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. डोनी व फुलझरी या दोनच पाणवठ्यावर वन्यप्राण्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
- उमेश झिरे, प्राणी मित्र, मूल.